Thu. Jan 20th, 2022

‘हे श्रेय निव्वळ मनसैनिकांचे’ – राज ठाकरे

महाराष्ट्रातील सर्व दुकानांवरील नामफलकाच्या पाट्या ‘मराठी’तच असाव्यात असा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र दुकानाच्या मराठी पाट्यांवरून राज्यात नवे राजकारण सुरू झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये वादाला तोंड फुटले आहे. हे श्रेय निव्वळ मनसैनिकांचे अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक ट्विटद्वारे सादर करत राज्य सरकारला इशारा दिला आहे. राज ठाकरे पत्रकात म्हटले की, २००८, २००९साली पाट्या मराठीत असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलन केले, शिक्षा भोगल्या. मात्र काल महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला. तर याचे श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्यामुळे त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. तसेच बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. यावर अधिकार फक्त महाराष्ट्र सैनिकांचाच आहे, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

तसेच राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारचेही अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, सरकारला मी इतकेच सांगेन की आता कच खाऊ नका, या निर्णयाची अंमलबजावणी योग्यपद्धतीने करा, असा मजकूर राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकात लिहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *