गोव्यातून ही व्हॅनिटी व्हॅन तपासासाठी आणण्यात यावी; पोलिसांचा आग्रह

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. दरम्यान, आतापर्यंत न्यायालयात नितेश राणे सचिन सातपुते यांची भेट झालेल्या व्हॅनिटी व्हॅनचा मुद्दा सरकारी पक्षाकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे गोव्यातून ही व्हॅनिटी व्हॅन तपासासाठी आणण्यात यावी, असा पोलिसांचा आग्रह आहे.
नितेश राणे यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये सरकारी पक्षावर टोला लगावला आहे. गोव्यातून व्हॅनिटी व्हॅन तपासासाठी आणण्यात यावी, अशी मागणी सरकारी पक्ष करत आहे. त्यामुळे आज तपासासाठी व्हॅनिटी व्हॅन मागवत आहेत, उद्या कोकण रेल्वेने प्रवास करताना काही प्रकरण घडले तर कोकण रेल्वेसुद्धा तपासासाठी मागवाल, असा खोचक टोला नितेश राणेंचे वकील सतीश मानशिंदे यांनी लगावला आहे.
बुधवारी नितेश राणे जामिनावर?
संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी नितेश राणे यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी सरकारी पक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. बुधवारी नितेश राणेंच्या जामिनावर निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नितेश राणे यांना आजची रात्रसुद्धा तुरुंगात काढावी लागणार आहे.