Fri. May 7th, 2021

जगातल्या सर्वात डेंजर ‘काकां’चं पुण्यातल्या बँकेला धमकीपत्र

पुणे तिथे काय उणे? असं म्हटलं जातं, ते खरंच आहे. पुणेरी पाट्या आणि पुण्यातील लोकांचे ‘किमान शब्दांत कमाल अपमान’ करण्याचे किस्से जगप्रसिद्ध आहेत. मात्र पुण्यातल्या एका जनता सहकारी बँकेला एका पुणेरी थेट पत्र लिहून आपण जगातले सर्वांत डेंजर माणूस असल्याचं सांगितलंय. या पत्रात काय लिहिलंय, हे वाचलं की या माणसाच्या रागाचं कारणही कळेल.

बँकेतले कर्मचारी आपल्याला काका म्हणतात, या गोष्टीमुळे चिडलेल्या एका 43 वर्षीय इसमाने बँकेच्या मॅनेजरला थेट पत्रच पाठवलं आहे.

या पत्रात आपण 22 वर्षांच्या तरुण मुलीशी लग्न केल्याची टिमकीही वाजवली आहे.

‘ओ काका’!

‘तुमच्या बँकेतील कर्मचारी कसे आहेत हे मला पूर्वीपासून माहिती आहे, तरी, माझं वय 43 वर्षं असून मी नुकतंच एका 22 वर्षीय मुलीशी लग्न केलं आहे. तरी मला ‘काका’ म्हणून माझा अपमान करू नका’ असा दम त्यांनी आपल्या पत्रातून दिला.

‘जर पुन्हा असा अपमान झाला, तर बघाच’ असं म्हणत पत्राच्या शेवटी ‘जगातला सर्वात डेंजर मनुष्य आहे मी’ अशी धमकीही दिली आहे.

निव्वळ ‘काका’ म्हटल्याने या माणसाला एवढा राग आला, की त्याने यासंदर्भात मॅनेजरला पत्र लिहून आपण किती वर्षांचे आहोत, आपल्या बायकोचं वय काय आणि आपण किती डेंजर आहोत ते पटवून द्यायचा प्रयत्न केलाय. हे पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या पत्राची सत्यता बँक तपासून पाहत आहे.
मात्र आता कुणालाही “ओ काका” म्हणताना थोडा विचारच करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *