पंतप्रधान मोदींच्या जीवावर कोण उठलंय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला असून दहशतवाद्यांची मदत घेऊन हल्ला घडवला जाईल, अशी धमकी देणारा ई-मेल राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई कार्यालयात आला आहे. त्यामुळे या ई-मेलची कसून चौकशी करण्यात येत असून सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
ई-मेलमध्ये काय म्हटले आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी २० स्लिपर सेल आणि २० किलो आरडीएक्स तयार असल्याचे ईमेलमध्ये म्हटले आहे. तसेच अनेक दहशतवाद्यांची संबंध असल्याचे ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, पंतप्रधानांच्या हत्येचा कट उघडकीस येऊ नये, म्हमून आत्महत्या करत असल्याचेही ई-मेल पाठवणाऱ्याने म्हटले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याच्या माहितीबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांना कुणी धमकी देत असेल तर ते योग्य नाही. याकडे गांभीर्याने पहावे लागेल. हे धमकीचे पत्र महाराष्ट्रातून पाठवण्यात आले की अन्य ठिकाणाहून, याची चौकशी करण्यात येईल. आणि या चौकशीतूनच सत्य समोर येणार आहे, असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.