ज्ञानवापी मशिदीचे तीन तास सर्वेक्षण

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणप्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यानुसार आजपासून ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी मशिदीच्या तळघर आणि पश्चिमेकडील भिंतीतील चार खोल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.
वाराणसी न्यायालयाच्या निर्णयानुसार आजपासून ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणास सुरूवात झाली आहे. आज सुमारे तीन तास मशिदीचे सर्वेक्षण करण्यात आले. सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी सर्वेक्षणासाठी महाधिवक्ता आयुक्त, सहाय्यक, वादी, प्रतिवादी, दोन्ही पक्षांचे वकील दाखल होते. तर सर्वेक्षणासाठी मशिदीच्या आवारात प्रवेश केलेल्यांचे मोबाईल जमा करण्यात आले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या आवारातील खोल्यांची चित्रफिती करण्यात आली. तसेच मशिदीच्या कुलुपांवर गंज चढला होता. त्यामुळे कुलुपांच्या चाव्या असूनही कुलूप तोडून सर्वेक्षण पथकाने आत प्रवेश केला.
मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले असून बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच चित्रफिती करणाऱ्या छायाचित्रकाराने काहिही सांगण्यास नकार दिला आहे. दरम्यान, १७ मे रोजी ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे.