Fri. Oct 7th, 2022

कबरीवर रोषणाई करण्यासाठी टायगर मेमनची धमकी

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीबाबत वाद चिघळला आहे. याकूब मेमनची कबर ही स्मारकासारखी करण्याची धमकी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी टायगर मेमनच्या नावाने दिली असल्याचे समोर आली आहे. बडा कब्रस्तान ट्रस्टशी संबंधित एका व्यक्तीने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे. टायगर मेमनच्या सूचनांचे पालन न केल्यास तुम्ही या जगातून गायब व्हाल अशीही धमकी देण्यात आली.

मुंबई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बडा कब्रस्तान येथील काही जागा मेमन कुटुंबीयांच्या नावाने करण्यासाठी तक्रारदारामागे मेमन कुटुंबीयांशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा करणाऱ्या मोहम्मद मेमन यांनी तगादा लावला होता. मात्र, सदरील काम माझ्या अखत्यारीत येत नसून त्याबाबत निर्णय घेता येणार नसल्याचे आम्ही त्यांना सांगितल्याचे तक्रारदाराने म्हटले. त्यानंतर तक्रारदाराला फोन आणि एसएमएस करून मागणी सुरूच ठेवली होती. त्यानंतरही तक्रारदार त्याला न बधल्याने मोहम्मद मेमन यांनी धमकी देण्यास सुरुवात केली. मोहम्मद मेमन याने म्हटले की, याकूब भाई शहीद झाला आहे. मात्र, टायगर भाई अजूनही जिवंत आहे. तुम्ही बडा कब्रस्तानमध्ये जागा देण्याचे निश्चित करा अन्यथा टायगर भाईशी बोलून तुम्हाला ठिकाणी लावू. टायगर भाई काय आहे हे तुम्हाला माहित नसेल. टायगर मेमन अजूनही कोणाच्या हाती लागले नाहीत. पण, तुम्हाला गायब करतील अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारदारांने म्हटले.

या धमकीनंतरही आम्ही चुकीचे काम करणार नसल्याचे ठामपणे सांगितले. त्यानंतर टायगर मेमनचा नातेवाईक असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने आमची बदनामी करत ट्रस्टमध्ये तक्रार दाखल केली. आम्ही त्याचे काही काम करण्यासाठी पैशांची मागणी केली असल्याचे मेमनने ट्रस्टला दिलेल्या तक्रारीत म्हटले. टायगर मेमनच्या नावाने धमकी दिल्याने आमच्या जीविताचे बरेवाईट होण्याची भीती असल्याचे तक्रारदाराने म्हटले.

1 thought on “कबरीवर रोषणाई करण्यासाठी टायगर मेमनची धमकी

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.