पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार 25 लाख चौकीदारांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 25 लाख चौकीदारांशी संवाद साधणार आहेत.
संध्याकाळी साडे चार वाजता मोदी ऑडिओच्या माध्यमातून चौकीदारांशी संवाद साधतील.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी ‘मैं भी चौकीदार’ कॅम्पेन सुरू केले आहे.
होळीच्या पूर्वसंध्येला मोदी चौकीदारांशी साधत असलेला संवाद याच कॅम्पेनचा भाग असेल, अशी माहिती भाजपाकडून देण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी होळीचा आनंद देशभरातील चौकीदारांसोबत साजरा करतील, असे भाजपाचे माध्यम संपर्क प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार अनिल बलुनी यांनी सांगितले आहे.
यानंतर 31 मार्चला मोदी देशभरातील 500 ठिकाणच्या लोकांशी संवाद साधतील.
भाजपाच्या ‘मै भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी झालेल्या लोकांना मोदी संबोधित करणार आहेत.
मोदींनी ट्विटरवर सुरू केलेल्या मै भी चौकीदार मोहिमेत समाजाच्या सर्वच स्तरातील भरभरुन प्रतिसाद दिल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे.
मोदींनी शनिवारी ट्विटरवर मै भी चौकीदार कॅम्पेन सुरू केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या कॅम्पेनला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भाजपाने दिली.
आतापर्यंत 20 लाख लोकांनी ट्विटरवर #MainBhiChowkidarचा वापर केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे.
सोशल मीडिया आणि नमो ऍपच्या माध्यमातून एक कोटी लोक या कॅम्पेनमध्ये सहभागी झाल्याची माहिती पक्षाने दिली आहे.
‘मोदींनी सुरू केलेल्या मोहिमेचं रुपांतर आता लोकांच्या चळवळीत झाले आहे.
यामध्ये समाजाच्या सर्वच स्तरातील लोक अगदी उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होत आहेत,’ असे भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे.