Jaimaharashtra news

सायना, श्रीकांत टोकियो ऑलिम्पिकला मुकणार

मुंबई : भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांना टोकियो ऑलिम्पिकला मुकावे लागणार आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी सिंगापूर ओपन ही अखेरची बॅडमिंटन स्पर्धा होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ही स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यामुळे सायना आणि श्रीकांत यांच्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सिंगापूर ओपन स्पर्धेपूर्वी सायना आणि श्रीकांत यांच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा धूसर होती. मात्र त्यांना सिंगापूर ओपनच्या माध्यमातून ऑलिम्पिकचे तिकीट मिळवण्याची संधी होती. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सिंगापूर ओपन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सायना आणि श्रीकांत या भारतीय बॅडमिंटनपटूंच्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. सिंगापूर ओपन स्पर्धा १ ते ६ जून या कालावधीत पार पडणार होती. मात्र कोरोना परिस्थिती पाहता, सिंगापूर बॅडमिंटन संघटना आणि जागतिक बॅडमिंटन फेडरेशन यांनी ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सायना २००८ नंतर प्रथमच ऑलिम्पिकला मुकणार आहे. तसेच तिने यापुर्वी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले होते. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेत सायना आणि श्रीकांत या दोघांच्या अनुपस्थितीत आता पी. व्ही. सिंधूवर जबाबदारी आली आहे.

Exit mobile version