Wed. Jun 29th, 2022

मुख्यमंत्र्यांचा बदल्यांना चाप

महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय बदल्यांबाबत आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोणतीही प्रशासकीय बदली आता 30 जून पर्यंत करता येणार नाही. अगदी एखादा अपवाद असेल आणि आवश्यकता असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली केली जाऊ शकते. विशेष म्हणजे राज्य सरकारने मे महिन्यात बदल्या करा, असा आदेश दिला होता. पण त्यानंतर आता राज्य सरकाने थेट ३० जूनपर्यंत बदल्या न करण्याचा आदेश दिला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामागे राजकीय कारण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील प्रशासकीय बदल्यांना राजकीय ब्रेक दिला गेल्याची चर्चा सुरू आहे.

जून महिन्यात राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या सहा जागांची देखील निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीत मतदानाची वेळ आली तर आमदारांची नाराजी नको म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० जूनपर्यंत बदल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक पार पडल्यानंतर म्हणजे ३० जून नंतरच आता बदल्यांचे आदेश जारी होतील.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार करण्यात येणाऱ्या बदल्या २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षी ३०जून २०२२ पर्यंत करण्यात येऊ नयेत. परंतु प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने करावी असे राज्य सरकारच्या परिपत्रकात नमूद केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.