Tue. Jun 18th, 2019

नकारात्मकतेकडून सकारत्मकतेकडे…

0Shares

सर्वांच्या त्रासाला खूप कंटाळले… थेट रेल्वेस्टेशनवर धाव घेतली… गाडी येतच होती… मी रुळावर उडी घेणार इतक्यात तिनं मला धरलं आणि बाजूला घेऊन गेली… नंतर तिच्याबरोबरच मी मुंबईला आले…

ईश्वरी सांगत होती. ईश्वरी किन्नर (तृतीयपंथी) असून ती आंध्र प्रदेशातील आहे. तिथे राजमुंद्री जिल्ह्यात ती रहायची. तिच्या या ‘वेगळेपणा’मुळे गावातील टवाळ तिला चिडवायचे, त्रास द्यायचे. घरातही भावांकडून चांगली वागणूक दिली जात नव्हती. सुरूवातीला या सर्वांशी ती लढली, पण परिस्थिती बदलली नाही. म्हणूनच तिने स्वत:ला संपविण्याचा निर्णय घेतला. तिला रेल्वेस्टेशनवर वाचविणारी किन्नरच होती. तिने तिची समजूत घालत मुंबईला आणले. ईश्वरी आता विरारला राहते.
ईश्वरीची अजूनही झुंज सुरू आहे. वडिलांचे छत्र तर लहानपणीच हिरावले गेले होते. भावांच्या मनमानी आणि बेपर्वाईमुळे तिच्या आईला घर सोडावे लागले. आईचा ओढा जास्त ईश्वरीकडेच असल्याने जणू काही त्याची फळच भोगावी लागली. पण ईश्वरी तिच्या मदतीला धावली. राजमुंद्री जिल्ह्यात तिने जमिनीचा तुकडा खरेदी केला आहे. तिथे अद्याप पक्के घर उभे राहिलेले नाही. पण आई आणि ईश्वरीने पालकत्व घेतलेला तीन वर्षांचा मुलगा तिथेच एका शेडमध्ये राहतात.
ईश्वरी सांगते की, गरीबांना-गरजूंना मदत करून त्यांना आनंद देण्याचा माझा प्रयत्न आहे.
अशा प्रकारे नकारत्मकतेने ईश्वरीचा प्रवास सुरू होऊन, तो आता सकारत्मकतेच्या वाटेवर आहे…
————————–
…मदतीचे हात सरसावले!
या सर्व वाटचालीत ईश्वरीला दोघांची साथ मिळाली आहे. गावाकडे एका चर्चचे फादर आहेत. त्यांनीच मुलाचे पालकत्व घेताना ईश्वरीला मदत केली. आता ती मुंबईत असताना आई आणि त्या मुलाकडे तेच लक्ष देतात.
इथे मुंबईत ईश्वरी जिथे राहते, तिथे मुस्लीम गृहस्थ आहेत. ईश्वरी त्यांना ‘पप्पा’ म्हणते. ते तिची काळजी घेतात.

 

– मनोज जोशी, जय महाराष्ट्र

email: [email protected]

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *