Tue. Jun 15th, 2021

नजर नजर की बात है

किन्नर अर्थात तृतीयपंथी. यांच्याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते, वेगवेगळ्या भावना असतात. बहुतांश लोकांच्या मनात भीती असते. त्यांच्या शिव्याशाप वाईट असतात, असा काहींचा समज आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये ते समोर येताच, काहींची अस्वस्थपणे चुळबूळ सुरू होते; विशेषत: बायकांची! किन्नरांना पाहताच काहीजण लगेच पाकिटातून पैसे काढून हातात ठेवतात आणि किन्नर जवळ येताच, त्यांना ते पैसे देऊन टाकतात; तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा भाव असतो. काहीजण त्या समोर येताच, इथं-तिथं पहायला लागतात. तर, काहींच्या दृष्टीनं ती केवळ टिंगल करण्याचा विषय असतात. मी सुद्धा त्यांच्याकडं बघायचं टाळतो. पण एक अनुभव असा आला, की त्यांच्याकडं पाहण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला !
आॅफिसला जाण्यासाठी मी दुपारी विरारहून दादर लोकल पकडतो. एक किन्नर मला काहीतरी म्हणून जात असे. सुरुवातीला मी त्याकडं दुर्लक्ष केलं. पण नंतर एक दिवस चिडून दरवाजातच जाऊन उभा राहिलो. ती आली आणि म्हणाली, ‘क्या सेठ, कैसा है? मैं हमेशा बुलाती, तो तुम देखता नहीं.’ ‘ठीक हूँ,’ असं सांगून मी तिला पैसे दिले. नंतर नंतर हे रोजच झालं. जवळपास वर्ष झालं, आमच्या गप्पा सुरू आहेत.

ती हैदराबादची आहे. तिचं नाव ईश्वरी! तिनं माझी आणि कुटुंबीयांची चौकशी केली. पुढे ती गप्पा मारताना माझ्या कुटुंबीयांचीही नियमितपणे चौकशी करीत होती.
एक दिवस तिनं सांगितलं की, ‘आम्ही काही जणांनी मिळून आता दर गुरुवारी जिवदानीच्या पायऱ्यांजवळ गरीब निराधार वृद्धांना जेवण द्यायला सुरुवात केली आहे. कधी तरी नुसताच येऊन जा.’ मी म्हणालो, ‘हो, येईन नक्की.’ अर्थात, माझं काही जाणं झालं नाही. आता विरार पश्चिमेला एका अनाथ आश्रमात ती महिन्यातून एकदा, दोनही वेळचं जेवण‍ देते.
मध्यंतरी मला आणखी एक नवीन माहिती समजली. मी चकीतच झालो. तिनं एका लहान मुलाचं पालकत्व स्वीकारलंय!! तेही कायदेशीररीत्या!! त्यावेळी ते अगदी दोन दिवसांचं अर्भक होतं. हा मुलगा आता तीन वर्षांचा झाला आहे. आंध्र प्रदेशातील एका शाळेत त्याची अ‍ॅडमिशन झालीय!! तिथं ईश्वरीची आई त्याच्याकडे लक्ष देते. मे महिन्यात त्याचा वाढदिवस साजरा करण्यात झाला. तिथं काहींना जेवण देण्यात आलं आणि स्त्रियांना साडी-चोळी दिली.
असं काही ऐकल्यानंतर काही बोलायला शब्दच नसतात. या मुलाला मायेची ऊब देणाऱ्या ‘तिनं’ मनात खूप आदराचं स्थान निर्माण केलंय.
—————————
या किन्नराप्रमाणंच आणखी एक किन्नर परिचयाची आहे. विरारलाच भेट झाली. आता फार कमी भेटते.
या दोघींची खासियत अशी की, त्यांचं ‘लचकणं-मुरडणं’ नसतं. शांतपणे समोर येऊन उभ्या राहतात, पैसे दिलेत, नाही दिलेत तरी आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवला जातोच. दोन रुपयांचं नाणं दिलंत तर, इमानेइतबारे एक रुपया परत करतात. पाच रुपये दिले तर, चार रुपये परत करतात.
ही दुसरी किन्नर ग्रॅज्युएट आहे अन् दक्षिणेकडचीच आहे. भाऊ शासकीय सेवेत मोठ्या हुद्यावर. ‘आई आणि कुटुंबीय मला परत बोलावतात. पण मी अशी आहे, म्हणून परत जात नाही. त्यांना मी सांगितलं की, मी येणार नाही. माझं व्यवस्थित चाललंय,’ असं तिनं सांगितलं.
रविवारी लोकलमध्ये नियमित प्रवासी नसतात. दुपारच्या वेळेस गाडीत अनेक जण जिवदानी देवीचं दर्शन घेऊन परत जाणारे असतात. त्यामुळे ही किन्नर डब्यात शिरल्यावर पहिल्यांदा ही गाडी कुठून कुठे जाणार आहे, कुठल्या स्थानकांवर थांबणार आहे, याची ओरडून माहिती देते आणि नंतर पैसे मागते.
————————
एकीकडं अत्याचाराच्या बातम्या समोर येत असतात… अनेकदा लहान मुलंच लक्ष्य केली जातात… तीही जवळच्याच व्यक्तीकडून! (अशांना व्यक्ती म्हणायचं का?) प्रोफेशनच ते असल्यानं पर्याय नसतो, वाचकांप्रमाणे पान उलटून टाळता येत नाही… मन उद्विग्न होतं…
पण एक वेगळं जग आहे… चांगुलपणाचं… हे आपल्या ध्यानीमनीही नसतं. आपण देशातलं राजकारण, आॅफिसमधलं राजकारण, वैयक्तिक हेवेदावे, जातपात, धर्मभेद या सर्व गुंत्यात अडकतो, न पेक्षा अडकवून घेतो. त्यापेक्षा आजूबाजूला घडत असलेल्या अशा पॉझिटिव्ह घटनांतून काही तरी शिकत, बोध घेत मनामध्ये कुठेतरी आता दडून बसलेल्या आणि अचानक केव्हा तरी बाहेर येणा-या ‘अविचारा’च्या रावणाचं दहन करायची, खरी गरज आहे…!

– मनोज जोशी, जय महाराष्ट्र

email: manoj.joshi3103@gmail.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *