Jaimaharashtra news

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अत्याधुनिक बसस्थानकं उभारण्यासाठी आरखडे सादर करा, परिवहन मंत्र्यांचे आदेश

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी  राज्यातील एसटी बसस्थानकातील स्वच्छता आणि नवीन बसस्थानक बांधण्यासंदर्भातील कामाचा आढावा घेतला. या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्र्यांनी कामाच्या पहिल्या टप्प्यामध्ये नाशकातील त्र्यंबकेश्वर, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि दापोली या बसस्थानकाचे काम तातडीने पूर्ण केले जावे, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

यासंदर्भात राज्य सरकारच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन माहिती देण्यात आली आहे.

तसेच राज्यातील एसटी बसस्थाकांमधील स्वच्छता, आसन व्यवस्था, शौचालयं, पाणपोई यासारख्या प्राथमिक सुविधांकडे एसटी महामंडळाने जबाबदारीपूर्वक लक्ष द्यावे, असे आदेश दिले आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी एसटी परिवहनाच्या आगारात तसेच बसस्थानकावर प्राथमिक सोयी सुविधांची वाणवा असते. शौचालय अस्वच्छ असतात.

त्यामुळे विशेष करुन महिला वर्गाची गैरसोय होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष लक्ष  देण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आले आहे.

तसेच अनिल परब यांनी सर्व सुविधा युक्त अशा अत्याधुनिक बसस्थानकांचा आरखडा सादर करावा, असेही आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले.

मंत्रालयातील बैठकीला परिवहन मंत्र्यांव्यतिरिक्त एसटी महामंडळाच्या बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक राजेंद्र जावंजळ, मुख्य अभियंता प्रशांत पोतदार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version