स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण…

शिवाजी महाराज होणं जेवढं कठीण होतं त्याहून कठीण जिजाऊ होणं आहे. शिवाजी महाराज खूप मोठे झाले कारण जिजाऊ त्यांच्याहून मोठ्या होत्या. आपल्यातल्या स्त्रीशक्तीचा प्रत्यय देत सामाजिक संस्कारांचा आदर्श घालून देणाऱ्या या मातेने स्वराज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. अशा या थोर राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेच्या टीमने १५० रोपटी लावली. या कार्यक्रमाला अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि वृक्षसंवर्धन चळवळीत अग्रणी असलेले अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित होते.

‘कलावंत हा कलाकेंद्री असलाच पाहिजे पण त्याला सामाजिक भानही असायलाच हवे’, या जाणिवेतून हा वृक्षारोपणाचा संकल्प केल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी याप्रसंगी सांगितले. शिवजयंती निमित्ताने शिरूर मध्ये बायोडायव्हर्सिटी पार्क उभारणार असल्याचे डॉ. कोल्हेनी यावेळी सांगितलं. झाडांना पण एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे मान देण्याचे आवाहन करीत शिवभक्तांबरोबर या वृक्षारोपणाची हिरवी मशाल, या वृक्षारोपणाचा विचार घेऊन शिवनेरीवर देखील जाऊ, असंही ते म्हणाले.

सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान मिळवलं आहे. महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा, जिजाऊंचे संस्कार या मालिकेद्वारे प्रेक्षकांना पहायला मिळत आहेत. कला आणि सामाजिकता जपत संपन्न झालेले हे वृक्षारोपण राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या विचारांना खऱ्या अर्थाने दिलेली मानवंदना आहे.

Exit mobile version