Thu. Sep 29th, 2022

मोहन भागवत यांच्याकडून बाबासाहेब पुरंदरे यांना श्रध्दांजली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहावे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले, ‘पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला. तो ध्यास मनात ठेवून ध्येय प्राप्तीकरिता तत्व रूप आदर्श पुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालवली.’

  ‘दादरा नगर हवेली च्या मुक्तिसंग्रामात सैनिक म्हणून ते लढले होते. शिवाजी महाराजांची कथा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर त्यांनी घराघरात पोहोचवली. त्यासाठी जीवनभर असंख्य परिश्रम केले. अत्यंत कठीण परिस्थितीतून केलेल्या या वाटचालीतुनच ‘जाणता राजा’सारख्या भव्य व प्रेरक नाट्य शिल्पाची निर्मिती त्यांनी केली. त्या देशभक्त व परिश्रमी शिवशाहीर यांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी त्यांचे स्फूर्तीदायक जीवन समाजामध्ये पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप व प्रेरणा सतत जागृत ठेवील,’ अशा शब्दांत मोहन भागवत यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी निधन झाले. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. आणि न्युमोनियाच्या उपचारांदरम्यान वयाच्या शंभरीत त्यांची प्राणज्योत मालवली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.