पालकमंत्र्यांचा अचानक ताफा थांबला, अन् वाहतूक कोंडीने झाले नागरिकांचे हाल

राजकीय मंत्र्यांंच्या दौऱ्यांमुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अशी अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत.
दरम्यान वर्ध्यामध्ये मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे नागरिकांना मोठ्या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला आहे. यामुळे या दौऱ्यांविषयी सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर निघत असल्याचे चित्र वर्ध्यामध्ये पहायला मिळाले.
वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार हे आज शनिवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अशातच वर्धा येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ पालकमंत्र्यांनी अचानक ताफा थांबवला.
यानंतर पालकमंत्र्यांनी पुतळ्याची पाहणी करत तेथे असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र याच दरम्यान अचानक ताफा थांबल्याने पोलिसांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
पोलिसांनी ताफा थांबताच रस्त्यावरील वाहतूक थांबवली याच दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
पालकमंत्र्यांनी अचानक थांबवलेल्या ताफ्यामुळे नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.