Mon. Dec 6th, 2021

‘इंदुरीकरांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या तोंडाला काळं फासू, मुख्यमंत्र्यांना केबिनमध्ये कोंडू’, तृप्ती देसाईंचा इशारा

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी आपत्यजन्माविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर वातावरण तापल्यावर अखेर इंदुरीकरांनी दिलगीर व्यक्त केली खरी. मात्र तरीही वाद संपायचं नाव घेत नाही. येत्या 4 दिवसांत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल न झाल्यास आपण त्यांच्या तोंडाला काळं फासू, असा इशाराच तृप्ती देसाई यांनी दिलाय.

मुलगा किंवा मुलगी जन्मण्यासाठी सम आणि विषम तारखेला स्त्रीसंग करण्याचं विधान इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात केलं होतं. या वक्तव्यावरून त्यांची सर्व स्तरांतून टीका झाली. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्रमक होत अहमदनगरच्या पोलीस अधिक्षकांना भेटून इंदुरीकर महाराजांविरोधात लेखी तक्रार दाखल केली. तसंच त्यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही पत्राद्वारे केली.

इंदुरीकरांनी यानंतर आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं म्हणत दिलगीर व्यक्त केली. यानंतर हा वाद इथेच मिटेल, असं वाटलं होतं. मात्र तृप्ती देसाई आता मागे हटायला तयार नसल्याचं दिसून येतंय.

‘येत्या चार दिवसांत इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल झाला नाही, तर आम्ही अकोले येथे त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्या तोंडाला काळं फासू‘, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिलाय. एवढ्यावरच न थांबता जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर इंदुरीकरांना पाठीशी घालत असतील, तर त्यांना केबिनमध्ये कोंडून ठेवू, असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.

तृप्ती देसाईंविरोधात इंदुरीकर महाराजांच्या सर्थनार्थ अनेक वाकरी तसंच विविध समूदाय उभे राहिले आहेत.

तसंच संभाजी भिडे यांनीही इंदुरीकर महाराजांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इंदुरीकरांच्या माफीनाम्यानंतरही हे प्रकरण आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *