Thu. May 6th, 2021

मुंबईसाठी दोन लाख रेमडेसिवीर इंजेक्शन

महाराष्ट्रासह देशभरात रुग्णांचा रेमडेसिवीर मिळण्यासाठी आक्रोश सुरू असताना मुंबई महापालिका आयुक्तांनी मुंबईसाठी तब्बल दोन लाख रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविली आहेत. ही इंजेक्शन्स जास्त दाराने खरेदी झाल्याचा वाद निरर्थक असून या क्षणी रुग्णांचा जीव वाचवणे यालाच माझे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही रेमडेसिवीर मिळावे यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरु आहे. वाढते कोरोना रुग्ण आणि रेमडेसिवरचा पुरवठा याचे प्रमाण रोजच्या रोज व्यस्त बनत चालले आहे. एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या म्हणण्यानुसार रेमडेसिवीर बनविणाऱ्या एकूण सात कंपन्या असून मधल्या काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर संबंधित कंपन्यांनी रेमडेसिवीरचे उत्पादन करणे बंद केले होते. गेल्या दोन महिन्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागल्यानंतर रेमडेसिवीरची मागणी पुन्हा वाढली असून संबंधित कंपन्यांनी उत्पादन वाढवायला सुरुवात केली असली तरी वाढीव पुरवठा २५ एप्रिलनंतर उपलब्ध होईल. आजघडीला रोज ५० हजार रेमडेसिवीरचा पुरवठा होत असून प्रत्येक जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार रेमडेसिवीरचे वाटप केले जाते असे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले. दरम्यान केंद्र सरकारनेही रेमडेसिवीरच्या निर्यातीला बंदी लागू केली असून देशातील वेगवेगळी राज्ये निविदा काढून मिळेल त्या किमतीला रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रातही हाफकीन महामंडळाने रेमडेसिवीर खरेदीसाठी निविदा जाहीर केली असून निविदेत कॅडिला कंपनीला ५७,१०० कुप्या पुरवण्याची निविदा मिळाली. ६६५ रुपये ८४ पैसे प्रतीकुपी दराने हे रेमडेसिवीर मिळणार असून अद्यापि याचा पुरवठा संबंधित कंपनीकडून करण्यात आलेला नाही.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात आजघडीला १७ हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण असून या रुग्णांना तसेच आगामी काळातील रुग्णवाढ लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी स्वतंत्रपणे तात्काळ निविदा मागविण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी जेव्हा निविदा काढल्या होत्या तेव्हा कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही हे लक्षात घेऊन आयुक्त चहल यांनी थेट रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांशी संवाद साधून निविदा भरण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर महापालिकेने काढलेल्या निविदेत मायलन या एकाच कंपनीने निविदा भरली. एकच पुरवठादार असल्याने काही दिवस थांबून मायलन कंपनीला पुरवठ्याचे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. मायलन कंपनीने रेमडेसिवीरच्या प्रतिकुपीसाठी १५६८ रुपये दर दिला असून दोन लाख कुप्यांचा पुरवठा ही कंपनी करणार आहे. यापैकी २० हजार कुप्यांचा पुरवठा कंपनीने केला असून हाफकिनला मिळालेल्या ६६५ रुपये दरापेक्षा दुप्पट किमतीला मुंबई महापालिका रेमडेसिवीर कशी खरेदी करते असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.

अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांनी रेमडेसिवरचे दर किती असावे यावर काही निर्बंध घातले आहेत का, याची आम्ही विचारणा केली असता दर निर्बंध लागू केलेले नाहीत असे एफडीएने स्पष्ट केले आहे. मुंबईतील वाढते रुग्ण आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी रेमडेसिवीर उपलब्ध करून देणे यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याने निविदेत आलेल्या दरानुसार आम्ही दोन लाख रेमडेसिवीर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे आयुक्त चहल म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *