Wed. May 19th, 2021

गायीच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी

राज्यात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ही मोकाट जनावरे अनेकदा आक्रमक होऊन नागरिकांवर हल्ला करतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान माजलगावातून अशीच एक घटना समोर आली आहे.

माजलगाव शहरामध्ये मोकाट गायींनी हैदोस घातला आहे. त्यांनी शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी चार महिलांवर चवताळून हल्ला केल्याचे समोर आले आहे. या घटनांपैकी एक हल्ल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये गायींनी दोन महिलांवर हल्ला केल्याचं दिसून येत आहे. हल्ल्यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यातील एकीची प्रकृती अस्वस्थ आहे.

माजलगाव शहरात मोकाट गायींनी उच्छाद घातला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास प्रभाग एक मधील रहिवासी पुष्पाबाई साखरे व मुक्ताबाई भिसे या दोघींवर दोन गायींनी अचानक हल्ला केला.

त्वेषाने अंगावर येत या गायींनी महिलांना शिंगानी व पायांनी तुडवून काढले. गायीला पकडण्याचा आठ दहा तरुणांनी प्रयत्न केला परंतु गाय मुक्ताबाई यांना शिंगावर घेऊन आपटत राहिली. तिने पुष्पाबाई यांना पायाने तुडवल्याने पुष्पाबाईंच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.

तर मुक्ताबाई यांच्या गळ्यात शिंग घुसले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान या भागात दुसऱ्या ठिकाणीही दोन महिला व एका मुलीला गायीने मारल्याची घटना घडली आहे. मोकाट गायींच्या अशा हल्ल्यांमुळे शहरात गायींच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *