Thu. May 6th, 2021

१३ विद्यापीठांच्या परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन होणार

राज्य सरकारकडून १ मेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे इतर व्यवहारांप्रमाणेच परीक्षांचं नियोजन देखील काहीसं विस्कळीत होण्याची शक्यता होती. मात्र, आता राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. उद्यापासून राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांमधल्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे.

आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे पर्याय देण्यात आले होते, विद्यापीठांना त्यासंदर्भात निर्णय घेण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा सुरू देखील केल्या होत्या. मात्र, आता सर्व १३ अकृषी विद्यापीठांना ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.’कोविडच्या परिस्थितीमुळे आणि नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. त्यामुळेच आम्ही सर्वानुमते निर्णय घेतलाय की महाराष्ट्रातल्या सर्व १३ अकृषी विद्यापीठांमध्ये उरलेल्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील.’

‘या परीक्षा घेताना जर विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी निर्माण होणार असतील, तर त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती मी सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरुंना केली आहे. या परीक्षांमधून कोणतेही विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता या विद्यापीठांनी घेतली पाहिजे’, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *