Fri. Oct 7th, 2022

मध्यरात्री उद्धव गट-शिंदे गटात जोरदार राडा

शिवसेना आणि शिंदे गटातील धुसफूस वाढू लागली आहे. मुंबईतील प्रभादेवीत गणेश विसर्जनादरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादीनंतर मध्यरात्री मोठा राडा झाला. दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. दादर पोलीस स्टेशन परिसरातही दोन्ही गट आमनेसामने आले होते. यावेळी शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला.यामध्ये विभागप्रमुख महेश सावंत बचावले असल्याचा दावा शिवसेनेने केला. मात्र, सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मध्यरात्री सुरू झालेल्या राड्यावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पडदा पडला. पोलीस चौकशीनंतर सरवणकर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशनबाहेर पडले. राड्याच्या घटनेमुळे प्रभादेवीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो.

गणेश विसर्जनादरम्यान, शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटाच शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. शिंदे गटात असलेले संतोष तेलवणे यांनी गणेश विसर्जना दरम्यान झालेल्या वादाबाबत फेसबुकवर आणि व्हाट्सएपच्या एका पोस्टमध्ये अपशब्द वापरले होते. त्यावरून झालेल्या वादातून शिवसैनिकांनी संतोष तेलावणे यांना शनिवारी मारहाण केली. संतोष तेलवणे हे शिंदे गटात गेल्यानंतरच शिवसैनिकांमध्ये संताप होताच. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे या संतापात अधिकच भर पडली. तेलवणे प्रकरणानंतर शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी प्रभादेवी सर्कलजवळ गोंधळ घातला. त्याशिवाय पोलिसांशीदेखील हुज्जत घातल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व घटनांनंतर दादर पोलिसांनी दोन्ही गटाच्या काहीजणांना ताब्यात घेतले.

दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्यरात्री पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.