Tue. Jun 28th, 2022

पंतप्रधान – मुख्यमंत्री आमनेसामने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बुधवारी आभासी पद्धतीने संवाद साधलाय. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे मोदींनी संवाद साधला असून देशातील कोरोना परिस्थितीविषयी ते बोलत होते. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना इंधनावरील कर कमी करण्याचे मोदींनी आवाहन केले आहे. याप्रकरणी, बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे जीएसटीचे २६,५०० कोटी रुपये थकलेले आहेत असा टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनावरील कराबाबत काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फैलावर घेतले असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. केंद्राकडे जीएसटीची थकबाकी आहे असं म्हणत ठाकरे यांनी ती आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  माध्यमांशी संवाद साधला. ‘घाबरण्यासारखं काही नाही, मात्र काळजी घ्यायला हवी’ असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसेच मास्क सक्तीचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या बैठकीनंतर घेतील असंही त्यांनी सांगितलं आहे. देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. दिल्लीसह कर्नाटक, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्येही मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसंच पंजाब सरकारनं देखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा असा सल्ला दिला आहे. आता महाराष्ट्रात देखील मास्क सक्ती करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. पंतप्रधानांनी मास्क सक्तीचा निर्णय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर सोडला असून त्याविषयी निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक आयोजित केली आहे. महाराष्ट्रातील वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेता पुन्हा मास्क सक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याविषयीचे बैठकीतील निर्णय लवकरच जाहीर होतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.