Tue. Aug 9th, 2022

उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे

अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. दरम्यान, उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास आता एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा)कडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी एनआयएकडे पथक अमरावतीमध्ये दाखल झाले आहे. तर उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे.

उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ प्रसार माध्यमांवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळेच उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे आणि भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती. त्यामुळे आता उमेश कोल्हे यांच्या हत्येमागे वादग्रस्त नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? असा सवाल सर्व स्तरावरून उपस्थित होत आहे.

दरम्यान, उमेश कोल्हे हत्या प्रकरणाच्या चौकशी करण्यासाठी एनआयएचे पथक अमरावती शहरात दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केलेली आहे. तसेच याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहितीही समोर आली असून एनआयएचे पथक अधिक तपास करत आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयानेही उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्विट केले की, ‘अमरावतीमध्ये २१ जून रोजी उमेश कोल्हे यांच्या निर्घृण हत्येचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या हत्येमागील कटकारस्थान तसेच संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंधाची कसून चौकशी करण्यात येणार आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.