पाण्याखाली दगडावर चित्र रेखाटणारा अवलिया

रत्नागिरी : प्राणी, पक्षी, देवदेवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची हुबेहूब चित्र काढणारी वेगवेगळे चित्रकार आपण पाहिले पण पाण्याखाली जाऊन श्वास रोखून दगडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि महादेव यांचे चित्र काढणारा अवलिया कधी पाहिला आहे का? रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात सावर्डे इथं विजय शिंदे या तरूणानं नदीपात्रात पाण्याखाली जाऊन श्वास रोखत छत्रपती शिवाजी महाराज आणि महादेवाचे दगडावर चित्र काढून अनोखा विक्रम केला आहे.
चिपळूणमधील कुशिवडे गावातील विजय शिंदे याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. सावर्डे गावात त्याचा स्टुडिओ आहे, लहानपणापासूनच त्याला चित्रकलेची आवड असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत विविध चित्र काढली पण काही तरी वेगळं करण्याची त्यांची जिद्द असल्यामुळे पाण्याखाली जाऊन चित्र रेखाटण्याचा विचार त्याने केला आणि त्यानुसार रत्नागिरी येथील जयगडनदीत पाण्याखाली ३फूट खोल जाऊन त्याने एका दगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्रकाढण्यास सुरुवात केली. दगडावर कोळसा आणि रंगीत खडूच्या साहाय्याने चित्र रेखाटले. हे चित्र रेखाटण्यासाठी त्याला १ तास ३९ मिनिटे लागली तर
पाण्याखाली राहून श्वास रोखतं चित्र रेखाटताना त्याला १६३ वेळा पाण्याबाहेर येऊन श्वास घ्यावा लागला.
त्याने हे चित्र दगडावर रेखाटताना कोणत्याही प्रकारच्या स्विमिंग उपकरणाचा म्हणजेच ऑक्सिजन सिलेंडर ,स्विमिंग गॉगल्स इत्यादीचा वापर केला नाही. अशा प्रकारे प्रथमच पाण्याखाली जाऊन दगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र रेखाटून महाराजांना एक आगळी वेगळी सलामी दिली त्यातून एक नवा विक्रम केला. सोशल मीडियावर विजय यांनी व्हिडीओ अपलोड करताच अनेकांनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीय. यानंतर विजय शिंदे यानं जयगडच्या नदीत पाण्याखाली जाऊन एका दगडावर महादेवाचे चित्र काढले आहे . यासाठी त्याला ४३ मिनिटे लागली तर ७३ वेळा पाण्याबाहेर येऊन श्वास घ्यावा लागला. याही चित्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.