Sunday, February 15, 2026 06:25:36 AM

Budget 2026 : 'धूर' निघणार! बीडी झाली स्वस्त; पण दारूचे दर भिडले गगनाला; तळीरामांच्या खिशाला बसणार झळ

ज्यांना संध्याकाळी 'ग्लास' हातात घेतल्याशिवाय चैन पडत नाही, अशा मद्यप्रेमींची नशा उरवण्याचे काम या अर्थसंकल्पाने केले आहे. दारूचे दर वाढणार असल्याचे तळीरामांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

budget 2026  धूर निघणार बीडी झाली स्वस्त पण दारूचे दर भिडले गगनाला तळीरामांच्या खिशाला बसणार झळ

Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी संसदेत आपला सलग नववा अर्थसंकल्प सादर केला. दररोज टपरीवर जाणाऱ्या ग्राहकांवरही या अर्थसंकल्पाचा परिणाम होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने एक अजब समतोल साधला असून, सुटाबुटात फिरणाऱ्यांपासून ते अगदी साध्या मजुरांपर्यंत सर्वांवर परिणाम होणार आहे.

ज्यांना संध्याकाळी 'ग्लास' हातात घेतल्याशिवाय चैन पडत नाही, अशा मद्यप्रेमींची नशा उरवण्याचे काम या अर्थसंकल्पाने केले आहे. दारूचे दर वाढणार असल्याचे तळीरामांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मात्र, दुसरीकडे चक्क बिड्यांचे दर कमी करून सरकारने 'बीडी' बहाद्दरांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे बीडी ओढणाऱ्यांच्या खिशातले पैसे वाचणार आहेत. केवळ व्यसनच नाही, तर पायातील बुटांपासून ते स्वयंपाकघरातील ओव्हनपर्यंत आणि गंभीर आजारांच्या औषधांपासून ते परदेशी प्रवासापर्यंत सरकारने कुठे कात्री लावलीय तर कुठे सवलतीची खैरात केलीय, याची संपूर्ण यादी..

स्वस्त होणाऱ्या वस्तू आणि सेवा
- देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने अनेक कच्च्या मालावरील सीमाशुल्क कमी केले आहे. यामुळे मोबाईल फोन्स, मोबाईल बॅटरी आणि ईव्ही (EV) बॅटरीच्या किमतीत लक्षणीय घट होणार आहे. 
- आरोग्याच्या आघाडीवर मोठा दिलासा देताना, कर्करोगाच्या (कॅन्सर) 17 औषधांवरील आणि मधुमेहाच्या (डायबिटीज) औषधांवरील कस्टम ड्युटी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. 
- चामड्याच्या वस्तू, सिंथेटिक पादत्राणे, कापड, बायोगॅस आणि मिश्र वायू (CNG) स्वस्त होणार आहेत.
- गृहिणींसाठी 'मायक्रोवेव्ह ओव्हन' आणि सौर ऊर्जा वापरणाऱ्यांसाठी सौर पॅनेलची काच स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- परदेशात शिक्षण घेणे आणि वैयक्तिक वापरासाठी परदेशातून मागवल्या जाणाऱ्या वस्तूंवरील कर 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर आल्याने मोठा फायदा होणार आहे.

हेही वाचा - Budget 2026: निर्मला सीतारमण यांची महिलांसाठी मोठी घोषणा; 'या' नव्या योजनेमुळे बदलणार ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चित्र

खिशाला कात्री: महागड्या वस्तूंची यादी
एकीकडे अनेक सवलती दिल्या असताना, दुसरीकडे व्यसनाधीनता कमी करण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी सरकारने काही वस्तूंवर कर वाढवला आहे.
- यामध्ये प्रामुख्याने मद्य (दारू), सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. (मात्र, गावठी उत्पादन असलेली बीडी स्वस्त झाली आहे.)
- भंगार (स्क्रॅब), विविध खनिजे आणि पीव्हीसी फ्लेक्स शीटच्या किमती वाढणार आहेत.
- शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 'सिक्युरिटी ट्रांझॅक्शन टॅक्स' (STT) वाढवण्यात आल्याने फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O) मधील ट्रेडिंग आता महाग पडणार आहे.
- आयात केलेल्या छत्रीच्या भागांवरही किमान शुल्क लावल्याने स्वस्त चिनी छत्र्यांच्या किमतीत वाढ होऊ शकते.

निर्यात आणि रोजगाराला बळ
अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, चामडे आणि कापड उद्योगातील निर्यातीला चालना देण्यासाठी सीमाशुल्क माफ करण्यात आले आहे. संरक्षण क्षेत्रातील सुट्या भागांवरही सवलत दिल्याने देशांतर्गत संरक्षण उत्पादन स्वस्त होईल. मत्स्य व्यवसाय आणि कोको उत्पादनांना जागतिक ब्रँड बनवण्यासाठी सरकारने विशेष तरतूद केली आहे. या सर्व बदलांमुळे केवळ वस्तूंच्या किमतीच कमी होणार नाहीत, तर देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन गरिबी निर्मूलनास मदत होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Union Budget 2026 : शेतकरी सुखावला! कापूस ते काजू.. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरघोस घोषणा; 'हे' आहेत 7 मोठे फायदे

              

सम्बन्धित सामग्री