Mon. Dec 6th, 2021

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला सात वर्षं पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला केंद्रात सत्तेत दुसऱ्यांदा येत आज एकूण सात वर्ष पूर्ण झाली आहेत. २०१४ मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपा नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत असून, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देखील ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटमध्ये त्यांनी मोदी सरकारने केलेल्या कामांना उजाळा दिला असून, सरकारच्या एकूण कामगिरीबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘मागील सात वर्षात देशातील जनतेनं पंतप्रधान मोदी यांच्या सेवा आणि सर्मपणावर विश्वास दाखवला आहे. यासाठी मी देशवासियांना नमन करतो. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवून भारताच्या विकासाचा गाडा अखंडितपणे पुढे घेऊन जाऊ, याचा मला पूर्ण विश्वास आहे’, असं शाह यांनी म्हटलं आहे.

‘या सात वर्षांमध्ये मोदीजींनी देशहिताला सर्वोच्च मानून दृढनिश्चय आणि सर्वांसाठी आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरीब, शेतकरी आणि वंचित वर्गांना विकासाच्या मुख्य धारेशी जोडलं. त्यांचं जीवनमान उंचावलं. त्याचबरोबर आपल्या सशक्त नेतृत्वाच्या बळावर भारताला एक मजबूत राष्ट्र बनवले’, असं शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज ७७वी ‘मन की बात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ७७ व्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. ‘कोरोना काळात ज्या राज्यांत चक्रीवादळ आले त्या राज्यांतील लोकांनी ज्या प्रकारचे साहस दाखवलं ते कौतुकास्पद आहे. या संकटाच्या समयी त्यांनी मोठ्या धैर्याचं दर्शन दाखवलं. राज्य शासन आणि प्रशासन दोघांनीही एकत्र येऊन या आपत्तीचा सामना केला’, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

‘या कोरोनाच्या काळात ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलंय त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या काळात ज्यांचं वेगवेगळ्या प्रकारे नुकसान झालंय त्यांच्यासोबत संपूर्ण देश उभा आहे. कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळी देशात केवळ एकच टेस्टिंग लॅब होती, आता देशात अडीच हजारांहून जास्त लॅब कार्यरत आहेत, तसेच त्यांच्या माध्यमातून रोज 20 लाखांहून जास्त चाचण्या केल्या जात आहेत’, अशी माहिती मोदी यांनी दिली.

आपल्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याचं सांगत या सात वर्षाच्या काळात आपण ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रावर देशाचा कारभार केला, देशासाठी प्रत्येक क्षण हा समर्पित भावनेनं काम केलं, या काळात अनेक समस्या आल्या पण प्रत्येक वेळी आम्ही मजबूत झालो, असंदेखील मोदी यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *