जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठानजीक गोळीबार, विद्यार्थी जखमी

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. पोलीस आणि मीडियासमोरच या माथेफिरूने ‘जय श्रीराम’ म्हणत आंदोलकांवर गोळीबार केला.
नागरिकत्व कायदा (#CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (#NRC) विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात अनेक दिवसांपासून निदर्शनं सुरू आहेत. आज गांधी पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर #CAA आणि #NRC विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जामिया मिलिया विद्यापीठ ते राजघाट मार्गादरम्यान शांतीपूर्ण मोर्चाचं आयोजन केलं होतं.
त्यावेळी अचानक गर्दीतून एक व्यक्ती समोर आली. मोर्चेकऱ्यांवर पिस्तूल रोखत “किसको चाहिये आज़ादी? ये लो आज़ादी” असं ओरडत या माथेफिरूने गोळीबार केला. यावेळी त्याने ‘जय श्रीरामच्या’ घोषणाही दिल्या.
माथेफिरूने केलेल्या या गोळीबारात आंदोलकांपैकी एक विद्यार्थी जखमी झाला आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्याचं नाव शादाब फारूख असल्याचं सांगण्यात येतंय. जखमी विद्यार्थ्याला AIIMS मध्ये दाखल करण्यात आलंय.

अज्ञात माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या घडनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. माथेफिरू तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याची चौकशी सुरू आहे.