Mon. Mar 30th, 2020

यूपीत भाजपला धक्का; पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव

वृत्तसंस्था, लखनऊ

भाजपला उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीत धक्का बसला आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जाणाऱ्या गोरखपूर मतदारसंघात समाजवादी पक्षाने जोरदार मुसंडी मारत भाजपच्या उमेदवाराचा धुव्वा उडवला. तर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचे वर्चस्व असलेल्या फूलपूर मतदारसंघातही भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. सपाला या पोटनिवडणुकीत मायावती यांच्या बसपाचा पाठिंबा होता. भाजपचा पराभव करण्यासाठी अनेक वर्षांची राजकीय कटुता विसरून सपा-बसपा एकत्र आले होते. या आघाडीमुळेच भाजपचे सगळे डावपेच निष्फळ ठरले. योगी आदित्यनाथ यांनीही पोटनिवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्यावर सपा-बसपाच्या मैत्रीवर निशाणा साधला.

फूलपूर मतदारसंघात सपाने मोठ्या फरकाने विजय मिळवला. सपाचे उमेदवार नागेंद्र पटेल यांनी 59 हजार 613 मतांनी भाजपचे उमेदवार कौशलेंद्र पटेल यांचा पराभव केला. नागेंद्र यांना 3 लाख 42 हजार 796, तर कौशलेंद्र यांना 2 लाख 83 हजार 183 मतं मिळाली. गोरखपूरमध्ये सपाचे उमेदवार प्रवीणकुमार निषाद यांनी 4 लाख 56 हजार 513 मतं मिळवत 29 वर्षांनंतर भाजपचा गड उद्ध्वस्त केला. भाजपचे उमेदवार उपेंद्र शुक्ल यांना 4 लाख 34 हजार 652 मतं मिळाली. योगी आदित्यनाथ यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *