धक्कादायक प्रकार; मुस्लिम मुलासोबत प्रेमसंबंध ठेवणाऱ्या हिंदू महिलेला कुटुंबियांनी जिवंत जाळलं

पूर्व उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका हिंदू महिलेनी मुस्लिम व्यक्तीसोबत प्रेमसंबंध ठेवल्यानं तिला तिच्या कुटुंबियांकडून जिवंत जाळण्यात आलं आहे. ही महिला २८ वर्षीय असून हिच्या हत्येसाठी दीड लाखाची सुपारी देण्यात आली होती. मृत महिलेचे वडिल, भाऊ आणि दोन नातेवाईकांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. शिवाय हत्येसाठी सुपारी दिली होती, अशी माहिती सोमवारी पोलिसांनी दिली.
कुटुंबातील सदस्यांनी हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता सुपारी दिलेल्या भाडोत्री मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे. चार फेब्रुवारीला महिलेचा जळालेला मृतदेह आढळला. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्याह वृत्तनुसार तीन फेब्रुवारीच्या रात्री तिची हत्या झाल्याचा संशय आहे. या महिलेचे वडिल लष्करात होते.
महिलेचे विवाहित मुस्लिम पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. एकदा ती त्याच्याबरोबर पळून सुद्धा गेली होती. मात्र काही दिवसात ती परत आली. आमचा आक्षेप असताना सुद्धा तिने प्रेमसंबंध तोडले नाहीत, असं महिलेच्या वडिलांनी पोलीस चौकशीत सांगितलं. धानघाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीगिना गावात चार फेब्रुवारीला सर्वप्रथम एका महिलेचा अर्धा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. महिलेची ओळख पटवून गुन्हेगारांना शोधण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके स्थापन करण्यात आली असून सध्या या प्रकरणावर पोलिस चौकशी करत आहे.