Wed. Jun 23rd, 2021

तुम्हालाही मूत्रमार्गाच्या समस्या सतावताय? मग दुर्लक्ष करू नका

मुंबई – शरीरास हानिकारक दुषित पदार्थ आणि अतिरिक्त क्षार, पाणी यांचे रुपांतर लघवीमध्ये होतं आणि मूत्रनलिकांद्वारे ही लघवी मूत्राशयामध्ये पाठविली जाते. वेळोवेळी शरीरातून ती उत्सर्जित केली जाते. शरीरातील मूत्रपिंडं रक्तशुध्दीकरण आणि पाणी, क्षार नियमनाचे कार्य करतात. शरीरातील अनेक जैवरासायनिक क्रियांमध्ये टाकाऊ पदार्थ तयार होतात. या टाकाऊ पदार्थांपैकी काही पदार्थ मूत्रपिंडात वेगळे काढले जातात. मात्र मूत्रमार्गातील असंतुलन, अतिसक्रीय मूत्राशय तसेच मूतखड्यासारख्या मूत्रमार्गाच्या समस्या मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळे निर्माण करतात. यासंबंधी तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. मूत्राशयासंबंधी समस्या आढळल्यास घाबरू न जाता आपल्या डॉक्टरांशी संवाद साधणे अधिक गरजेचे आहे.
शरीरातील इतर प्रणालींप्रमाणेच, अगदी एखाद्याच्या मूत्र प्रणालीमध्येही समस्या उद्भवू शकतात. आपले वय आणि लिंग यांचा विचार न करता आपल्याला मूत्रमार्गाच्या समस्येचा त्रास होऊ शकतो. या समस्या पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही दिसू शकतात आणि मूत्रमार्गावर परिणाम करतात. मूत्रमार्गाच्या समस्या पुनरुत्पादक अवयवांवरही दुष्परिणाम करू शकतात.मूत्रमार्गाच्या संसर्गास (यूटीआय) मूत्रमार्गाच्या सर्वात सामान्य समस्येपैकी एक म्हणून संबोधले जाऊ शकते. हा संसर्ग मूत्रमार्गात उद्भवू लागतो आणि बुरशी, जीवाणू आणि विषाणूसारख्या सूक्ष्मजंतूमुळे होतो आणि यामध्ये मूत्रपिंड, मूत्रमार्ग किंवा मूत्राशय यांचा समावेश होतो. जर संक्रमण आपल्या मूत्रपिंडात पसरले तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. मूत्रमार्गातील असंयम (मूत्र गळती) ही आणखी एक समस्या आहे. मधुमेह, गर्भधारणा आणि कमकुवत मूत्राशय या समस्येस कारणीभूत ठरू शकते. तणाव, असंतोष हे देखील मूत्र गळतीस कारणीभूत ठरतो आणि पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्येही अशा प्रकारची समस्या दिसू शकते. अतिसक्रिय मूत्राशय म्हणजे असा त्रास ज्यात मूत्राशय चुकीच्या वेळेला आंकुचन पावतं आणि लघवीला होणं. यात बऱ्याचदा संयम सुटून आपल्याला कळण्याआधीच मूत्रविसर्जन झालेलं असतं. शिवाय ही लक्षणं नियंत्रित करणंही काहीसं कठीण असतं. कारण, अतिक्रियाशील मूत्राशय बऱ्यापैकी लहरी बनतं.

लक्षणेः यूरॉलॉजिकल समस्यांची सामान्य चिन्हे म्हणजे ताप, सर्दी, मळमळ, उलट्या, दुर्गंधीयुक्त लघवी, वारंवार लघवी करण्याची तीव्र इच्छा, उलट्या होणे, कंटाळा येणे, ओटीपोटाचा त्रास, लघवी करताना जळजळ होणे, स्नायू दुखणे या मूत्रमार्गाच्या समस्या सूचित करतात.

उपचार: बहुतेक मूत्रमार्गातील समस्या अँटीबायोटिक्सद्वारे व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात. परंतु, जर आपण औषधोपचार करण्यास अयशस्वी ठरलात आणि लक्षणांमध्ये सुधार न दिसल्यास आपल्याला आपल्या मूत्र तज्ज्ञांकडे जावे लागेल आणि अनेकदा शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जाईल. एकदा लक्षणे आढळल्यास उशीर करू नका कारण असे केल्याने आपले आरोग्य बिघडू शकते.

डॉ. संतोष पालकर यांच्यानुसार या उपायांचा अवलंब करा…
– आपल्याला योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करावे लागेल. वारंवार लघवी करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
– चांगली वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. आपल्या जननेंद्रिय स्वच्छ ठेवा.
– ज्यामुळे मूत्राशयामध्ये जळजळ होऊ शकते असे द्रव पिणे टाळा. मद्यपान आणि कॅफेनयुक्त पेयांचे सेवन टाळा.
– रसायने उत्पादनांचा वापर टाळा.
– सौम्य उत्पादनांचा वापर करा.
– शारीरीक संबंधानंतर लगेच लघवी करण्यास विसरू नका.
– सैल व सूती कपडे वापरा.
महत्त्वाची बाब – काही मूत्रमार्गाच्या समस्या जास्त काळ टिकतात तर काही थोड्या काळासाठी असू शकतात. आपल्या शरीराने दिलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. जर वेदना किंवा अस्वस्थता असेल तर आपण ते मूत्रतज्ज्ञांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. आवश्यक उपचार शोधण्यासाठी वेळीच निदान करणे आवश्यक आहे. आपल्या शंकाविषयी डॉक्टरांशी चर्चा करा. जागरूक रहा आणि निरोगी रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *