Mon. Dec 6th, 2021

मसूद अझहरविरोधात अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनचा भारताला पाठिंबा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद विरोधात भारताला कूटनीतिक पातळीवर मोठे यश मिळताना दिसत आहे.

बुधवारी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

जैशने भारताचे अर्धसैनिक दल सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता, असं या प्रस्तावात म्हटलं आहे.

मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची पुन्हा एकदा मागणी करण्यात आली आहे.

मसूद अझहरविरोधात शस्त्रास्त्र बंदी, त्याच्या जागतिक प्रवासावर बंदी घालावी तसेच त्याची संपत्तीही जप्त करावी.

असे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने 15 सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद प्रतिबंध समितीला म्हटलं आहे.

‘व्हेटो पॉवर’ असलेल्या या 3 देशांनी मिळून हा प्रस्ताव सादर केला आहे.

हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रात मागील 10 वर्षांत चौथ्यांदा मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली जाणार आहे.

दरम्यान हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात मंजूर होईल की नाही हे पाकिस्तानचा मित्र चीनवर अवलंबून असेल.

चीन व्हेटो पॉवर असलेल्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असून अनेकवेळा मसूदविरोधात आणलेल्या प्रस्तावाला त्यांनी विरोध केला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य देश चीनने पुलवामा दहशतवादी हल्ल्यात जैश ए मोहम्मदच्या नावाचा उल्लेख केलेल्या निवेदनाला महत्व दिलं नव्हतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *