Sat. Jul 2nd, 2022

कोरोना अन् मास्कचा वापर..

पुण्यासह देशभर अन् राज्यभर कोरोनाने गेले दीड वर्षांपासून थैमान घातले आहे. याचा परिणाम सगळीकडे जाणवत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला अन् त्यानंतर राज्यातील कोरोना रुग्णसंख्या पुण्यासह इतकी एवढी वाढली की लाखाच्या घरात गेली. यामध्ये अनेकजणांचा मृत्यूही झाला. कोरोनाची पहिली लाट झाली, दुसरी झाली अन् आता ओमायक्रॉनच्या माध्यमातून तिसरी लाट सुरू आहे. कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून राज्यकर्ते, प्रशासन अन् पोलीस नागरिकांना एकच आवाहन करत आहेत काळजी घ्या.

पण काळजी कशी घ्या तर अंतर पाळा, सॅनिटायझर वापरा अन् मास्क घाला… खर तर कोरोना टाळण्यासाठी हे तीन महत्वाचे आदेश पहिल्या लाटेपासून आतापर्यंत सरकार देत आलं आहे. मात्र यातील मास्क घालण्यावरून बरीच मतमतांतरे झाली. कोणी म्हटलं मास्क घातला तरी कोरोना होतो, तर कोणी म्हटलं मास्क घातले नाही पाहिजे तर कोणी म्हटले मास्क हा काही कोरोनावरील उपाय नाही. तर काहींचे म्हणणं होतं की मास्क कुठली वापरायची? मात्र सरकार मास्क वापरला पाहिजे यावर ठाम होत. सरकारने मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली अन् यातून लाखो रुपयांचा दंडही पोलिसांनी वसूल केला. तर दुसरीकडे मास्क वापरावा म्हणून पोलीस वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करत होते. ऐकतील ते नागरिक कसले मग मास्क न घालण्याची कारणे पुढे येऊ लागली. आता ओमयक्रोनच्या माध्यमातून कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. यातून नागरिकांना धोका नसला तरी कोरोनाचा पॉझिटिव्ह दर हा मोठा आहे.

 पुण्यासारख्या शहरात रोज चार हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून सर्व राज्यात परत नवीन निर्बध लागू केले. शाळा, महाविद्यालये, पर्यटन स्थळे बंद करण्यात आली तर इतर काही ठिकाणी मर्यादा घालून दिल्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणून पुण्याचे पालकमंत्री अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परत एकदा सर्वाचं लक्ष मास्ककडे वळवले. जर मास्क न घालता बाहेर पडला तर ५०० रुपये दंड आणि मास्क घालून रस्त्यावर थुंकला तर एक हजार रुपये दंड केला जाईल अस सांगितले. स्वतः अजित पवार कोरोना काळात आतापर्यंत एकाही कार्यक्रमात मास्कविना दिसले नाहीत. त्यांनी अनेक नेते, कार्यकर्ते यांना मास्क वापरा म्हणून भर कार्यक्रमात सुनावलेल आपण पाहिले आहे.

परंतु आता नागरिकांनी एन ९५ मास्क वापरले पाहिजे. तसेच कापडी मास्क वापरू नये, असे स्वतः उपमुख्यमंत्र्यानी सांगितल्यानंतर पुणे शहरात एन-९५ मास्क विक्रीत ७० टक्क्याने वाढ झाल्याच समोर आलं. आता शहरात पुणे पोलीस मास्क कारवाई करत आहेत. कोरोना घालवण्यासाठी नागरिकानी जेवढी काळजी घेणं गरजेच आहे तेवढा मास्क वापरण पण गरजेच आहे. कोरोना अजून किती दिवस, महिने राहील सांगता येत नाही पण आहे तोपर्यंत सर्व प्रकारची काळजी घेणं गरजेच आहे. कारण कोरोनाने जसे जीवन जगायला शिकवलं. तसे सर्वांच्याच आयुष्यात अविभाज्य घटक झाला आहे तो म्हणजे मास्क मग तो एन-९५ वापरा नाही तर वेगवेगळ्या रंगाचे. त्यामुळे कोरोना आहे तोपर्यंत तरी नागरिकांची मास्क पासून सुटका नाही हे मात्र नक्की.

– सचिन जाधव, पुणे

( या मताशी संपादक अथवा प्रकाशन संस्था सहमत असतीलच असे नाही. या लेखात लेखकाने मांडलेली मते स्वतंत्र आहेत. )

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.