Thu. Nov 26th, 2020

मसूद अझहरवर बंदी न घातल्यास क्षेत्रीय शांततेला धोका, अमेरिकेचा चीनला सल्ला

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी घालण्यासाठी भारताने पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या बैठकीत मसूद अझहरला ग्लोबल दहशतवादी घोषित करण्यात येण्याची शक्यता आहे.

भारताच्या मोहिमेला अमेरिकेनेही साथ दिली आहे. अमेरिकी परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रॉबर्ट पल्लादिनो यांनी आम्ही भारताबरोबर असल्याचे सांगितले आहे.

मसूद अझहरला ग्लोबल दहशतवादी घोषित केले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.

मसूद अझहर हा भारतातील उपखंडांमध्ये नांदणाऱ्या शांततेसाठी धोका आहे. जगात शांतता स्थापित झाली पाहिजे, या मुद्द्यावर अमेरिका आणि चीनची सहमती आहे.

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी न घातल्यास शांती प्रस्थापित होण्याच्या मोहिमेला धक्का बसेल, असे रॉबर्ट पल्लादिनो म्हणाले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले हे अमेरिकेत असून त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांची भेट घेतली आहे.

मसूद अझहरच्या मुद्द्यावर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळेच अमेरिकेकडून UNSCमध्ये मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

विजय गोखले यांनी काल अमेरिकेचे राजकीय व्यवहार सचिव डेव्हिड हेल यांच्याबरोबरही एक बैठक घेतली होती.

त्यांनी बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. दुसरीकडे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव भारताने याआधीही मांडला होता.

परंतु त्यावेळी चीनने विटोचा वापर करून तो रोखला. पुलवामा हल्ल्यानंतर पुन्हा एकदा मसूद अझहरच्या विरोधात वातावरण आहे.

अशातच अमेरिका, फ्रान्स, ब्रिटेन यांनी संयुक्तरीत्या मसूद अझहरवर बंदीचा प्रस्ताव आणला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *