तीरथसिंह रावत यांचा अखेर राजीनामा

उत्तराखंड: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मौर्य यांची शुक्रवारी संध्याकाळी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.
तीरथ सिंह रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्रीपदासाठी संधी दिल्याबद्दल पक्षाचे आभारही मानले. ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. केंद्रीय नेतृत्वानं वेळोवेळी मला संधी दिली. यासाठी मी नेतृत्वाचे आभार व्यक्त करतो’, अशी प्रतिक्रिया रावत यांनी दिली.
उत्तराखंडमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. पण त्यापूर्वीच तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने उत्तराखंडला आता काही महिन्यांसाठी नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. डेहराडूनमध्ये भाजपच्या आमदारांची शनिवारी दुपारी बैठक होणार आहे. या बैठकीत आमदारांपैकी एकाची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली जाईल.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत ४ जणांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये मंत्री धनसिंह रावत, बंशीधर भगत, हरक सिंह रावत आणि सतपाल महाराज यांचा समावेश आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत राज्य सरकारमधी उच्च शिक्षणमंत्री धन सिंह रावत यांचे नाव आघाडीवर आहे. रावत हे श्रीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. धनसिंह रावत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कॅडरमधून आले आहेत. उत्तराखंड भाजपमध्ये संघटन मंत्री होते. ७ ऑक्टोबरला १९७१ त्यांचा जन्म झाला. ते मुळचे पौडी गढवालचे रहिवासी आहेत. त्यांनी दोनवेळा एमए आणि राज्यशास्त्रात पीएचडी केली आहे.