आजपासून ६ ते १२ वर्षातील मुलांचे लसीकरण

देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. अशातच मुलांच्या लसीकरणाबाबत आनंदाची बातमी आली आहे. आता, ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. डीसीजीआयकडून कोवॅक्सिन या लशीला मान्यता देण्यात आली आहे.
भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने भारत बायोटेकला ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीची परवानगी दिली आहे. तसेच डीसीजीआयने भारत बायोटेकला पहिल्या दोन महिन्यांसाठी दर १५ दिवसांनी आणि त्यानंतर पाच महिन्यांसाठी १५ दिवसांनी माहिती देण्यास सांगितले आहे.
देशात कोरोनाचे निर्बंध हटवण्या आले आहेत. मात्र, आता पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आणि नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही देण्यात आले आहे. देशातील कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आनंदाची बातमी आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली होती. तर, आता ६ ते १२ वर्ष या वयोगटातील मुलानांही कोवॅक्सिन लस देण्यात येणार आहे.