तामिळनंतर तेलुगूमध्ये ‘पिंक’, अमिताभ बच्चन यांनी साकारलेलं पात्र निभावणार ‘हा’ स्टार!

हिंदी सिनेसृष्टीत महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारा सिनेमा म्हणून ‘पिंक’ सिनेमाला महत्त्व आहे. या सिनेमात 3 मुलींसोबत घडलेल्या विनयभंगाचा खटला लढणाऱ्या जबरदस्त वकिलाची भूमिका महानायक अमिताभ बच्चन यांनी साकारली होती. आपल्या खर्जातल्या आवाजातून ‘No’ ची परिभाषा सांगणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचं खूप कौतूक झालं होतं. तसंच अभिनेत्री तापसी पन्नू हिलादेखील या सिनेमामुळे बॉलिवूडमध्ये सूर गवसला होता.
तामिळ रिमेकमध्ये ‘या’ कलाकाराने साकारलेली भूमिका
या सिनेमाच्या लक्षणीय यशानंतर या सिनेमाचा तामिळ भाषेतही रिमेक करण्यात आला. ‘थला’ म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असणारा तामिळ अभिनेता ‘अजित कुमार’ यांनी या तामिळ रिमेकमध्ये अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या वकिलाची भूमिका साकारली होती. ‘नेरकोंडा पारवाई’ असं या सिनेमाचं नाव होतं.

तामिळमध्ये सिनेमाला मिळालेल्या यशामुळे आता तामिळ सिनेमाचे निर्माते बोनी कपूर हा सिनेमा तेलुगू भाषेतही पुन्हा बनवत आहेत. तेलुगू आणि तामिळ भाषेतील सिनेमांना आता भारतभरात मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मिळू लागलाय. तेलुगू सिनेमांना हिंदी भाषेत डब करून टीव्हीवर दाखवलं जातं आणि या डब्ड सिनेमांचा चाहता वर्ग वाढत चाललाय. त्यामुळेच तेलुगू रिमेकमध्ये कोणता अभिनेता अमिताभ यांच्या भूमिकेचं शिवधनुष्य उचलणार, याची उत्सुकता तेलुगूप्रमाणेच इतर भाषेतील चाहत्यांनाही होती. अखेर या प्रश्नावरील पडदा उठला आहे.

‘वकील साब’!
‘पिंक’च्या तेलुगू रिमेकचं नाव ‘वकील साब’ असं जाहीर करण्यात आलंय. तेलुगू सिनेसृष्टीत ‘पॉवर स्टार’ अशी उपाधी असणारा अभिनेता ‘पवन कल्याण’ या सिनेमात वकिलाचं पात्र साकारणार आहे. ‘वकील साब’ हा पवन कल्याण याच्या कारकीर्दीतील 26वा सिनेमा असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबद्दल विशेष उत्सुकता होती. ‘#PSPK26’ (Power Star Pawan Kalyan) हा हॅशटॅगही त्यामुळे Twitter वर ट्रेंडिंग होता.

मेगा स्टार चिरंजीवी यांचा धाकटा भाऊ आणि पॉवर मेगास्टार राम चरण तेजा याचा काका असणारा पवन कल्याण हा तेलुगू सिनेमांतील सुपरस्टार आहे. ‘पॉवर स्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवन कल्याणने काही काळ सिनेमांपासून दूर राहून राजकारणाचं पाणी चाखलं होतं.

यापूर्वीही ‘OMG’ या हिंदी सिनेमाच्या तेलुगू रिमेक ‘गोपाला गोपाला’ या सिनेमात पवन कल्याण याने हिंदी व्हर्जनमध्ये अक्षय कुमारने साकारलेली ‘श्रीकृष्णा’ची भूमिका साकारली होती.