Thu. Jul 2nd, 2020

World Cancer Day : ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन

मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्य़ा रूबाबदार व्यक्तिमत्वाने अनेक भूमिका गाजवणारे रमेश भाटकर यांचं कर्करोगाने निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. मुंबईच्या नेपियन्सी रोड येथील एलिझाबेथ हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठी आणि हिंदी सिनेमांत आपल्या रूबाबदार व्यक्तिमत्वाने, भारदस्त आवाजाने आणि पोलिसांच्या भूमिकांनी त्यांनी दबदबा निर्माण केला होता. मराठी नाटक, सिनेमा तसंच सिरियल अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या खास शैलीदार अभिनयाने ठसा उमटवला होता.

‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकात काशिनाथ घाणेकरांनी गाजवलेली ‘लाल्या’ची भूमिका त्यांच्यानंतर रमेश भाटकर यांनीच लोकप्रिय केली होती. केवळ नाटकांमधूनच नव्हे, तर मराठी सिनेमांमध्येही त्यांनी अनेक भूमिका केल्या. ‘माहेरची साडी’, ‘मराठा बटालियन’ यांसारख्या अनेक सिनेमांमधून त्यांनी काम केलं होतं. तसंच ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘दामिनी’, ‘पती माझे सौभाग्यवती’, ‘100 डेज’ यांसारख्या अनेक मालिकांमध्येही त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या.

हिंदी टीव्ही जगतामध्येही त्यांची ‘कमांडर’ ही मालिका देशा-परदेशातही लोकप्रिय झाली होती. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या पोलिसांच्या भूमिकेमुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली होती. गेल्या काही काळापासून ते कर्करोगावर उपचार घेत होते. अशातच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूबद्दल मराठी कलासृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *