Fri. May 7th, 2021

विकी कौशल साकारणार ‘फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ’ यांची भूमिका

विकी कौशलने त्यांचा आगामी चित्रपट ‘सॅम’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट भारताचे पहिले फिल्ड मार्शल म्हणून ओळखल्या जाणारे फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या
जीवनावर आधारित आहे. आज मानेकशॉ यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त विकीनेच या चित्रपटातील त्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे.

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ सिनेमात “हाऊ’ज द जोश” ही घोषणा देत बॉक्स ऑफिसवर आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारा अभिनेता विकी कौशल आपल्या एकाहून एक दमदार भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकतोय. क्रांतीकारक शहीद उधमसिंग यांच्या जीवनावर आधारित सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असणारा विकी आणखी एका महान देशभक्ताची भूमिका साकारण्यासाठी सज्ज होत आहे. हे देशभक्त म्हणजे 1971 सालच्या युद्धात पाकिस्तानची दाणादाण उडवणारे फिल्ड मार्शल ‘सॅम मानेकशॉ’.

‘राझी’ सिनेमाच्या दिग्दर्शिका मेघना गुलज़ार या फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचा जीवनपट दिग्दर्शित करणार आहेत. ‘राज़ी’ सिनेमात पाकिस्तानी सेना अधिकाऱ्याची भूमिका करणाऱ्या विकी कौशलनेच सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारावी, अशी मेघना यांची इच्छा होती. विशेष म्हणजे मेघना यांची स्क्रीप्ट वाचण्यापूर्वीच विकी याने सिनेमात करायची तयारी दर्शवली. या सिनेमाच्या शुटिंगची सुरुवात जरी 2021 साली होणार असली, तरी आज सॅम मानेकशॉ यांच्या 11 स्मृतिदिनानिमित्त विकी कौशल याने सॅम मानेकशॉ यांच्या वेशभूषेतील आपला फोटो चाहत्यांसाठी पोस्ट केला आहे.

स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी ‘सॅम मानेकशॉ’!

3 एप्रिल 1914 रोजी पंजाबच्या अमृतसर येथे पारशी कुटुंबात जन्मलेले सॅम मानेकशॉ आपल्या अभूतपूर्व कर्तृत्त्वाने देशाचे दुसरे फिल्ड मार्शल झाले.

सॅम मानेकशॉ यांची निवड 1932 मध्ये इंडियन मिलिट्री अकॅडमीत झाली. या अकॅडमीच्या पहिल्या बॅचचे ते सदस्य होते.

40 वर्षांच्या लष्करी कारकीर्दीत सॅम यांनी नेत्रदीपक  कामगिरी केली.

दुसऱ्या महायुद्धात त्यांच्या नेतृत्वाखाली सैन्याने पराक्रम गाजवला.

या युद्धात जपानी सैन्याने मशीनगनच्या सात गोळ्या सॅम माणेकशॉ यांच्यावर झाडल्या.

यात आतड्या, यकृत आणि मूत्रपिंडात या गोळ्या गेल्या होत्या. डॉक्टरांनी आशाच सोडली होती.  मात्र तरीही सॅम माणेकशॉ हे मृत्यूलाही धोबीपछाड देऊन जिवंत राहिले. एवढंच नव्हे, तर सैन्यात पुढेही पराक्रम गाजवत राहिले.

1969 मध्ये त्यांची सेना प्रमुख म्हणून नियुक्ती झाली

1971 मध्ये पाकिस्तानविरुद्ध युद्धात अमेरिकेची पाकिस्तानला साथ असूनही सॅम मानेकशॉ यांच्या कुशल युद्धनीतीपुढे पाकिस्तानला धुळ चारावी लागली.

त्यांच्याच युद्धकौशल्यामुळे पाकिस्तानचे तुकडे होऊन बांग्लादेशची निर्मिती झाली.

पाकिस्तानाची दारूण अवस्था करूनही पाकिस्तानी युद्धबंदींना त्यांनी एवढ्या सन्मानाने वागवले,की लाहोरमधील एका कार्यक्रमात एका पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याने त्यांच्या चरणांवर आपला फेटा ठेवून त्यांचे आभार मानले आणि भारताचा जयजयकार केला.

माणेकशॉ यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे त्यांना अतिशय दुर्मीळ आणि विशेष असा ‘फिल्ड मार्शल’चा किताब देण्यात आला.

फिल्ड मार्शल किताब असलेली व्यक्ती अधिकारिकदृष्ट्या सैन्यात कार्यरत नसली, तरीही सैन्यातील अधिकारिक पदावर आयुष्यभर राहते आणि कधीही निवृत्त होत नाही.

आपल्या शौर्याने देशाचं नाव उंचावणाऱ्या सॅम माणेकशॉ यांची भूमिका करायची संधी ही अतिशय मानाची गोष्ट असल्यामुळेच तसंच मेघना गुलज़ारच्या दिग्दर्शनावर पूर्ण विश्वास असल्यामुळे विकी कौशलने स्क्रीप्टही न वाचता सिनेमाला होकार दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *