Wed. Oct 5th, 2022

बायको झाली बिबट्याचं अन्न, पिसाटलेल्या ‘गाढवाचं (दुसरं) लग्न’!

आपल्या प्रेमाचा माणूस सोडून गेल्यावर दुःखातिरेकाने त्याचा राग जगावर काढणारी माणसं आपण पाहिली असतील. त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं, की ती शांत झाल्याचंही आपण पाहिलं असेल. अनेक सिनेमे, मालिकांमध्ये अशी फ्रस्ट्रेट झालेली पात्रं आपण पाहिली असतील. पण ही भावना केवळ माणसांमध्येच असते, असं नाही… तर आपल्या जोडीदाराच्या वियोगाने एक गाढवही वेडं झालं… आणि त्याचा वेडेपणा आवरण्यासाठी या ‘गाढवाचं लग्न’ लावून दिलं गेलं.. ते ही दुसरं…   

पहिली बायको गेल्याने म्हैसूर येथील हुरा या गावातील एक गाढव चक्क  ‘देवदास’ बनलं. आपल्या सहचरिणीच्या वियोगाचा सूड सगळ्या जगावर घ्यायला निघालेल्या या गाढवाने गेल्या काही दिवसांपासून लोकांना लाथा मारून आणि चावून हैराण केलं होतं. गाढवाच्या वागण्यात झालेला बदल लक्षात घेऊन गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला.

 

गाढवाची शोकांतिका!

या गाढवाची एक जोडीदार होती. मात्र,  काही काळापूर्वीच त्याची जोडीदार बिबट्याची शिकार झाली होती. त्यानंतर हे गाढव अस्वस्थ झालं आणि लोकांवर हल्ले करू लागलं. ‘बायको’चा विरह असह्य झाल्याने गाढव असं वागत असावं, असा निष्कर्ष हुरावासीयांनी काढला आणि त्याच्यासाठी दुसरी बायको शोधण्याचं निश्चित केलं.

 

गाढवासाठी वधू संशोधन!

आसपासच्या गावात ‘वधू’संशोधन करण्याचे काम हुरावासीयांनी सुरू केलं. या शोधकार्यादरम्यान एका शेतकऱ्याला त्या गाढवाची कथा ऐकून दया आली आणि त्याने आपली गाढवीण मोफत दिली.

गाढवाचा जोडीदार विकत घेण्यासाठी गावकऱ्यांनी आधीच वर्गणी गोळा केली होती. पण, शेतकऱ्याने त्याची गाढवीण मोफत दिल्यानंतर गावकऱ्यांनी त्या दोघांचं वाजतगाजत लग्न लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, दोघांनाही नवीन कपडे शिवण्यात आले. एका पुजाऱ्याने त्यांचा विधीवत विवाह लावून दिला. लग्नानंतर गावात मिठाईसुद्धा वाटण्यात आली.

 

विशेष म्हणजे, लग्नापूर्वी दुगाण्या झाडत लोकांना चावणारं हे गाढव लग्नादिवशी मात्र गप्प होतं. लग्न लागल्यानंतर दोन दिवसात त्याची त्याच्या नवीन बायकोसोबत गट्टी जमल्याचं निरीक्षण ग्रामस्थांनी नोंदवलं आहे. त्यामुळे या नवपरिणित जोडप्याचा संसार सुखाचा होणार असल्याचं भाकितही त्यांनी वर्तवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.