Tue. May 11th, 2021

केमिकल कंपनीने सोडलं विषारी पाणी, ग्रामस्थांचा जीव धोक्यात!

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात असलेल्या दसरखेड MIDC मधील बॅन्जो केमिकल कंपनीने रसायनयुक्त पाणी नाल्यात सोडलं. ते पाणी रणथम येथील तलावात पोहोचल्याने तलावातील पाणी दूषित झालंय. ग्रामस्थांचं आरोग्य या पाण्यामुळे धोक्यात आलंय. ग्रामस्थांना इजा पोहचली असून अनेक जनावरं दगावली आहेत. या प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झालेत.

काय आहे प्रकरण?

गेल्या चार दिवसांपासून या परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने ‘बॅन्जो केमिकल’ने सोडलेलं रसायनयुक्त पाणी येथील तलावात पोहोचलं.

या केमिकलने पाण्याला दुर्गंधी तर सुटलीच, पण या पाण्यामुळे ग्रामस्थांना ऍलर्जी, खाजेचे प्रकार, उलट्या सुरू झाल्या आहेत.

या परिसरातील तीन म्हशी, एक गाय, अठरा बकऱ्या, एक बैलजोडी दगावल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ संतप्त झालेत.

या तलावातील पाणी पुढे पूर्णा नदी पात्रात जात असल्याने त्या ठिकाणी 22 गाव पाणीपुरवठा प्रादेशिक योजना आहेत.

दुर्गंधीयुक्त पाणी या योजनेच्या जॅकवेल मध्ये गेल्यास दसरखेड, विवरा, तांदुळवाडी, तालसवाडा, धरणगाव, कुंड बुद्रुक, कुंड खुर्द, रणथम, शिवनी, निंबोळी, तिघ्रा, भानगुरा, दुधलगाव, रणगांव, वाघोळा, नवीन दुधलगाव, चिंचोल, देवधाबा, गोराड, हिंगणा काजी, भालेगाव, खडकी, चिखली इत्यादी गावातील ग्रामस्थांचे आरोग्य सुद्धा धोक्यात येऊ शकेल, अशी शक्यता आहे. त्यामुळेच रणथम येथील सरपंच जयदीप पाटील, उपसरपंच उल्हास डमाळे, सुभाष राव पाटील, नीना मेहेंगे, चिखलीचे सरपंच राजेश कांडेलकर आदींसमवेत ग्रामस्थांनी ‘बँन्जो केमिकल कंपनी’ला जाब विचारण्यासाठी धडक दिली. या रसायनयुक्त पाण्याची तात्काळ विल्हेवाट न लावल्यास ग्रामस्थांनी कंपनी पेटवून देण्याचा इशारा दिलाय. लवकरच यावर उपाययोजना न केल्यास प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *