‘सगळंच केंद्र सरकार करणार मग तुम्ही काय करणार?’

पुणे : मराठा आरक्षण प्रकरणी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ‘केंद्राची भूमिका आरक्षणाच्या बाजूची आहे. असं असताना महाविकास आघाडी सरकार चुकीची माहिती देत होतं. काल सर्वोच्च न्यायालयात केंद्राने याचिका दाखल केल्यामुळे राज्य सरकार तोंडावर पडले आहे’, अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे.

‘अशोक चव्हाणांनी केंद्राचे आभार मानायला पाहिजे. परंतु ते नाचत येईना अंगण वाकडे असे वागत आहेत. केवळ आरोप करत आहेत. आता ५० टक्के मर्यादेचा केंद्राने याचिकेत समावेश करावा असे म्हणतात. सगळंच केंद्र सरकार करणार मग तुम्ही काय करणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.’उद्धव ठाकरेंनी जे त्यांच्या हातात आहे ते करावं. सरकार तोंडावर कुलूप लावल्यासारखं गप्प बसलंय. सरकारमधील लोक नाकर्ते आहेत, ते फक्त खुर्च्या उबवत आहेत.’ अशी टीकासुद्धा त्यांनी केली आहे.

‘आघाडी सरकारच्या मनात पाप आहे. मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही अशी त्यांची वृत्ती आहे. या सगळ्याला जेवढे अशोक चव्हाण जबाबदार आहेत, त्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. जर राज्य सरकार काही करत नसतील तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत.’ असं देखील विनायक मेटेंनी म्हटलं आहे.

Exit mobile version