Sat. Nov 27th, 2021

आयपीएल २०२० : स्पर्धेच्या सुरुवातीआधीच ‘हा’ मराठी खेळाडू बाहेर

आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी काही दिवसांपूर्वीच खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. यानंतर कोलकाता टीमला मोठा झटका लागला आहे. कोलकात्याच्या प्रवीण तांबेला आयपीएलच्या आगामी मौसमात खेळता येणार नाही.

प्रवीण तांबेने बीसीसीआयच्या नियमांचं उल्लघंन केल्याने आयपीएलच्या आगामी हंगामाला मुकावे लागाणार आहे.

नक्की प्रकरण काय ?

प्रवीण तांबेने मागील वर्षी दुबईतील शारजाह येथील टी-१० लीगमध्ये स्पर्धेत सहभाग घेतला होता.

बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या घोषणेशिवाय परदेशात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळता येत नाही.

त्यामुळे प्रवीण तांबेला आयपीएलच्या या मौसमात खेळता येणार नाही.

कोलकाता टीमने डिसेंबरमध्ये झालेल्या बोली प्रक्रियेत प्रवीण तांबेसाठी २० लाख रुपये मोजले होते. तसेच प्रवीण तांबे आयपीएलच्या या मौसमातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता.

याआधी प्रवीण तांबेनी आयपीएलमध्ये ३ संघाचे प्रतीनिधित्व केलं आहे.

प्रवीण तांबेने २०१३ साली ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.

प्रवीण तांबेने २०१३ ते २०१६ या ४ वर्षांच्या कालावधीत राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स आणि हैदराबाद या संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं.

हैदराबाद टीमने प्रवीण तांबेला २०१७ साली खरेदी केलं होतं. परंतु त्यावेळेस प्रवीणला अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

प्रवीण तांबेने आयपीएलमध्ये एकूण ३३ मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्याने २८ विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.

दरम्यान आयपीएलच्या तेराव्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *