मुंबई: चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हवाच! आपल्याकडे तऱ्हे तऱ्हेचे चहाप्रेमी पाहायला मिळतात कोणाला झोपेतून उठल्यावर एकदातरी प्यावा लागतो तर कोणाला तलफ लागरी रे लागली की हवाच. चहाची एवढी सवय झाली आहे की जीवनातला एक महत्वाचा भाग म्हणजे चहा झाला आहे. कारण चहामुळे आळस दूर होतो आणि कंटाळलेल्या शरीराला थोडी ताजगी मिळते. अशातच आपण प्रवास करताना सुद्धा चहाचा आस्वाद घेतोच पण जर का तुम्हीही ट्रेन प्रवासादरम्यान चहा घेत असाल तर थोडं सावध राहा. कारण हा चहा कसा तयार केला जातो हे जर का तुम्ही पाहिलंत तर आयुष्यात पुन्हा कधी चहा पिण्याचं मन करणार नाही. होय, विश्वास बसत नाहीये? तर मग हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा, यामध्ये चहा कसा गरम केला जातोय हे तुम्हाला कळेल.
हा व्हायरल व्हिडीओ mumbaibreakingnews24 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही चहाची किटली पाहू शकता. यामध्ये चक्क हीटर लावलं आहे. म्हणजे ट्रेनमध्ये आपण जो चहा पितो तो चक्क हीटरवर गरम केला जातोय. खरं तर चहा वारंवार गरम करणं हेच आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्यात हीटर ने गरम केलेला चहा म्हंटल तर अजून आजाराला कारण. वैद्यकिय तज्ज्ञांच्या मते पुन्हा पुन्हा गरम केलेला चहा घेतल्यास शरीरातील पित्त वाढतं आणि सोबत पोटाचे विकार सुद्धा होतात. पण ट्रेनमध्ये कदाचित नव्यानं चहा तयार करणं शक्य नसावं म्हणून विक्रेते एकदाच भरपूर चहा करतात आणि तो गरम करून विकतात. पण हा चहा थेट हीटरनं गरम केला जातोय.
हा व्हिडीओ १२ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. असो, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चहा प्यावा की नाही यावर शंका निर्माण झाली आहे.