पुणे: सिंहगड जिथं तानाजी मालुसरे यांनी प्राणांची आहुती दिली, जिथं शिवरायांच्या पराक्रमाची कहाणी आजही गडांच्या दगडांमध्ये गुंजते. पण याच पवित्र गडावर अलीकडेच काही टवाळखोर तरुणांनी मराठी अस्मितेवर गालबोट लावलं. परदेशातून आलेल्या एका पर्यटकाला त्यांनी मराठी शिवीगाळ शिकवत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना पाहून संतापाची लाट उसळली आहे.
सध्या सोशल मीडियावर फेमस व्हायच्या हव्यासात काही तरुण थेट मर्यादा ओलांडत आहेत. असाच प्रकार या व्हिडिओत दिसून आला. कॅनडामधून आलेल्या एका तरुणाला मराठी शिव्या शिकवून थट्टा केली गेली. भाषेचा अर्थ न समजल्यामुळे त्या तरुणाला हे लाजिरवाणं वाटलं नाही, पण हे करताना आपल्या संस्कृतीचा अपमान होत असल्याची जाणीव या टवाळखोरांना झालीच नाही.
या प्रकाराची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस तात्काळ कार्यरत झाले आहेत. संबंधित टवाळखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे. गुन्हा थोडासा वाटला तरी त्यामागची मानसिकता अत्यंत घातक आहे,असं स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही मांडलं जात आहे.
हेही वाचा: बोईस हॉस्टेलमध्ये गर्लफ्रेंडला आणण्याचा गजब कारनामा;सुटकेस उघडताच...
परदेशी पर्यटक गड किल्ले पाहायला येतात हे अभिमानाचं आहे. पण त्यांना आपली संस्कृती, भाषा समजावून सांगण्याऐवजी असं विकृत वर्तन करणं ही लाजिरवाणी बाब आहे. इतिहास जपणं ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सिंहगडावर घडलेली ही घटना केवळ त्या पर्यटकासाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी धोक्याची घंटा आहे असं म्हणत संपूर्ण राज्यातून शिवभक्तांनी आणि नेटकऱ्यांनी या = घटनेचा तीव्र निषेध केला आहे. 'गड सर करणं हे अभिमानाचं, तिथं अश्लील कृत्य करणं लाजिरवाणं' असं स्पष्ट मत अनेकांनी मांडलं आहे.