Mon. Dec 6th, 2021

विरारमधील कोविड रुग्णालयाच्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू

विरार: काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २४ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आज विरारमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली असून या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी १३ रुग्णांना आपला जीव गमवला आहे.

आज रात्री साडेतीनच्या सुमारास विरार पश्चिममध्ये असलेल्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागली. अतिदक्षता विभागातील एसी कॉम्प्रेसरला आग लागली. आग लागल्यानंतर इतर रुग्णांना वसई-विरारमधील इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर काही वेळातच आग विझवण्यात आली.

मृतांची नावे-

उमा सुरेश कनगुटकर (६३)
निलेश भोईर (३५)
पुखराज वल्लभदास वैष्णव(६८)
रजनी आर कडू (६०)
नरेंद्र शंकर शिंदे(५८)
कुमार किशोर दोषी(४५)
जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (६३)
रमेश टी उपायान (५५)
प्रवीण शिवलाल गौडा (६५)
अमेय राजेश राऊत (२३)
शमा अरुण म्हात्रे(४८)
सुवर्ण एस पितळे (६४)
सुप्रिया देशमुख (४३)

संपादन – सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *