Sat. May 15th, 2021

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात!

शशांक पाटील, मुंबई: ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असं कायम म्हटलं जातं आणि त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या शाळेने त्याच्या पालकांना पाठवलेले एक परिपत्रक व्हायरल झाले आहे. विराट नववीत असताना त्याच्या शाळेने त्याला दिल्लीच्या १५ वर्षांखालील संघासाठी कर्णधार म्हणून घोषित केले होते. तसे परिपत्रक ही त्याच्या घरी पाठवले होते आणि तोच कागद व्हायरल झाला असून विराट हा जणू कर्णधार होण्यासाठीच जन्माला आला असल्याचे म्हटले जात आहे.

आपल्या तडाखेबाज खेळासह मैदानावरील आक्रमक स्वभावासाठी विराट कायम ओळखला जातो. भारतीय कसोटी क्रिकेटला लाभलेला सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून विराटला नावाजले जाते. फलंदाजीतले अनेक रेकॉर्ड विराटच्या नावावर असून मूळचा दिल्लीचा असणारा विराट हा बालपणापासूनच क्रिकेट खेळत होता. विशेष म्हणजे विराट नवव्या इयत्तेत असताना फक्त क्रिकेटच्या चांगल्या संधी मिळाव्या, यासाठी सेव्हियर कॉन्व्हेंट या शाळेत शिकण्यासाठी गेला होता आणि तोच त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. त्याच्या अप्रतिम क्रिकेटमुळे त्याची दिल्लीच्या १५ वर्षांखालील संघात निवड झाली. कर्णधार म्हणून त्याला घोषित करण्यात आलं. त्यानंतर भारताच्या १९ वर्षांखालील संघातही विराट गेला आणि २००८ साली त्याने विश्वचषक भारतात आणला. ज्यानंतर त्याने परत कधीच मागे वळून पाहिलं नाही.

सद्यस्थितीला भारतासह जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून विराटकडे पाहिलं जात, मात्र इथवर पोहचण्याचा विराटचा प्रवास तितकाच खडतर होता. अवघ्या १८ वर्षांचा असताना विराटचे वडील वारले आणि अशा परिस्थितीतही विराटने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करत आपला खेळ सुरुच ठेवला. त्याने एका मुलाखतीत आपल्या खडतर प्रवासाबद्दल सांगितले देखील होते. ज्याठिकाणी कमी वयात वडिलांना गमावणं अशावेळी घरची परिस्थितीही जेमतेम असताना क्रिकेटवर लक्ष देणं अवघड होतं असं विराटने सांगितलं. दरम्यान या सर्वांनंतर ही सध्या विराटने केलेली कामगिरी ही उल्लेखनीयच आहे. त्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे, त्यातच त्याचा शालेय जीवनातील कर्णधार म्हणून करण्यात आलेला उल्लेख चाहत्यांना खूपच आवडला असून त्याचे शालेय परिपत्रक सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

संपादित- सिद्धी पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *