Thu. Jan 20th, 2022

राज्यातील नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान; ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक

वाशिम जिल्ह्यातील मानोरा नगर पंचायतची निवडणूक प्रक्रियेला प्रतक्षरित्या सुरुवात झाली असून मानोरा येथे १३ मतदान केंद्रावर मंगळवारी मतदान पार पडणार असून, येथील १३ प्रभागातून ५९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या मतदानाला सकाळपासून सुरूवात झाली असून भाजप आमदार राजेंद्र पाटणी आणि राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आमनेसामने आले आहेत.

सांगली जिल्ह्यात तीन नगरपंचायतसाठी मतदान होत आहे. कवठेमंकाळ, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील नगरपंचायतीच्या ३९ जागांपैकी १२५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तसेच या निवडणूकीत एकूण २१ हजार ८४३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, म्हसळा, माणगाव, तळा, पाली आणि खालापूर या सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. २ जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे तर ७९ जागांसाठी २३४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव, अर्धापूर, माहूर येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी ७.३० वाजता मतदान सुरु झाले. अर्धापूर नगरपंचायतच्या १३ जागांसाठी ६५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर २६ मतदान केंद्र असून १७ हजार ११३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नायगाव नगरपंचायत १४ पैकी तीन जागी काँग्रेस चेउमेदवार बिनविरोध आल्याने ११ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मतदानाची प्रक्रिया सकाळी सुरू झाली. जिल्ह्यात साक्री नगरपंचायतमध्ये १३ जागांसाठी ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत आहेत तर भाजप आणि काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. या नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजप नेते आमनेसामने आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *