Sun. Jun 20th, 2021

आता न्याय हवाच! 

मुली म्हणजे आपल्या आई वडिलांचा स्वाभिमान..काहीच समजत उमजत नसताना आई बाबा जे शिकवतात ते तंतोतंत लक्षात ठेवतात..समंजसपणा दाखवतात.. तडजोड करणं हे जणू भारतीय मुलींच्या रक्ताचंच भिनलेलं.. त्या सर्व पाहतात..अनुभवतात.. काहींना व्यक्त होता येतं तर काही जणी टाळतात..कारण म्हणतात ना परिस्थितीतच सर्व काही शिकवते.

 

लातूरमधलीच घटना तरी हेच सांगते. कंगोरे अनेक आहेत मात्र मनाला भिडणारा प्रश्न हाच.. तिच्या आत्महत्येला जबाबदार कोण? परिस्थिती कारणीभूत की सरकारी लालफितीचा कारभार? 21 वर्षाच्या शितल वायाळने आपलं आयुष्य संपवलं. का? कारण बाबा कर्जबाजारी, 5 वर्षांपासून नापिकी. कुटुंब कसंबसं दिवस काढतंय. 2 बहिणींची लग्न बाबांनी कशीबशी केली पण शितलच्या लग्नासाठी ना कुठली बँक ना कुठला सावकार कर्ज देत होता. 2 वर्षांपासून शितलच्या लग्नासाठी प्रयत्न सुरु होते. घरात नेहमी हाच ताणतणावाचा मुद्दा की लेकीचं लग्न कसं करायचं? आई बाबांची हीच अवस्था, तगमग शितलला सतावत होती. त्यातूनच तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. आत्महत्येपूर्वी चिठ्टी लिहिली. बाबांच्या डोक्यावरचा भार कमी करण्यासाठी जीवन संपवते. मुली आपल्या आई बापासाठी ओझं नसतात. पण शितलचा आयुष्य संपवून ओझं कमी करण्याचा निर्णय म्हणजे त्या आई बापावर सुल्तानी संकटापेक्षाही मोठं आभाळ फाटण्यासारखीच अवस्था. 

 

मला चांगलं आठवतंय 2015 मध्येही अशीच ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली. लातूरमधलीच 11वीत शिकणारी स्वाती पितळे.. बाबा शेतकरी. दुष्काळ तर पाचवीलाच पूजलेला. मात्र त्यातूनही जगाचा पोशिंदा आपल्या पोरीला शिकवण्यासाठी धडपडत होता. टोमॅटोची शेती होती. मात्र दुष्काळामुळे उत्पन्नच नव्हतं. स्वाती शिक्षणासाठी एसटीने प्रवास करायची. पास 260 रुपये. मात्र पास संपला 260 रु बाबांकडून कसे मागू? हा मोठा प्रश्न. आठवडाभर कॉलेजला जाऊ शकली नाही. आता परिक्षा कशी देणार? गहन प्रश्न.. बाबांचे प्रयत्न सुरु आहेत पण आपला भार त्यामच्यावर पडतोय याच विवंचनेतून तिने त्या टोमॅटोच्या सुक्या शेतात जाऊन किटकनाशक पिऊन आयुष्यच संपवलं.. 

 

काल शितलची आत्महत्येची घटना घडल्यावर स्वाती डोळ्यासमोर उभी राहिली. कोवळ्या मुली.. पण त्यांचं आयुष्य गेलं ती आई बाबांची ससेहोलपट पाहण्यातच! म्हणूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. 

 

आज आपल्या राज्यात शितल, स्वातीसारख्या अनेक मुली आहेत ज्यांना शिक्षण घ्यायचंय, लग्न करुन सुखी संसार करायचा आहे. मात्र आई बाबांच्या दु:खापलिकडे स्वत:चं सुख हा स्वार्थीपणा त्यांच्यात नाही.

 

रोज राज्यात शेतकरी, त्याचं कुटुंब, दांपत्य कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आपलं आयुष्य संपवतोय. शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक एकवटलेत. संघर्ष, आसूड यात्रा काढल्या जातायत. मात्र या यात्रेत शेतक-यांच्या मुलांसोबत एक वेळची खाणावळी नको. त्यांना कायमची भरपेट भाजी भाकरी खाता यावी यासाठी विरोधकांसोबतच सरकारचीही इच्छाशक्ती हवी. मुख्यमंत्री साहेब म्हणतात योग्य वेळी कर्जमाफी होईल. पण मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी राज्याच्या तिजोरीतून 24000 कोटी खर्चाची तयारी असणारं सरकार शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळेची वाट पाहतंय ही शोकांतिका वाटते. स्वाती आणि शितलसारख्या मुलींना खरा न्याय सरकारला द्यायचा असेल तर हीच खरी शेतकरी कर्जमाफीची योग्य वेळ आहे असं वाटतं. नाही तर जगाच्या पोशिंद्याचं कुटुंब असंच उद्धवस्त होत राहिलं तर त्याच्या आक्रोशाची झळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच सोसावी लागेल. 

 

वृषाली यादव, अँकर, जय महाराष्ट्र

ट्विटर हँडल:  @VrushaliGYadav

मेल आयडी :   vrush.yadav@gmail.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *