Sun. Jun 16th, 2019

पाण्यावरुन भारत-पाकिस्तानमधील वाद वाढणार ?

0Shares

भारत आणि पाकमध्ये येत्या काही दिवसात पाण्यावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये 59 वर्षांपूर्वी सिंधू जल करार झाला. या कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप दोन्ही देशांनी एकमेकांवर केला आहे.

त्यामुळे लवकरच हा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न महत्त्वाचा आणि संवेदनशील ठरणार आहे.
सध्या पाकिस्तानात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. आर्थिक राजधानी असलेल्या कराचीजवळच्या भागातील महिलांना पाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागते. पाकिस्तानातल्या बऱ्याच भागांमध्ये हेच चित्र आहे.

भारतातील परिस्थितीदेखील वेगळी नाही. याशिवाय देशातील 70 टक्के पाणी प्रदूषित झाले आहे, अशी आकडेवारी सरकारच्या संशोधनातून समोर आली आहे.

दुष्काळामुळे नद्या, धरणांमधील चित्र भयाण आहे. त्यामुळेच दोन्ही देशांमधील पाणी प्रश्न पेटू शकतो, असे वृत्त ब्ल्यूमबर्गने दिले आहे.

19 सप्टेंबर 1960 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू जल करार झाला होता. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला. याच कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप भारत आणि पाकिस्तानने एकमेकांवर केला आहे.

सध्या भारताकडून चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू आहे. यावर पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे.

भारताकडून सिंधू जल कराराचा उल्लंघन सुरू असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी भीती पाकिस्तानला आहे.
या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान त्यांचे एक पथक चिनाब नदीजवळ पाठवणार आहेत.

तर चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.

यामुळे हा प्रश्न लवकरच चिघळू शकतो. याचा परिणाम केवळ दक्षिण आशियाच नव्हे, तर संपूर्ण जगावर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *