मालेगावात मुसळधार पावसामुळे पुराचं पाणी अनेक घरांत

मालेगावमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराचं पाणी शहरातील प्रभाग क्रमांक 20 मधील वसाहतीच्या अनेक घरांत शिरलं होतं. जवळपास 3 फुटांपर्यंत पाणी घरात शिरल्याचं पाहून नागरिकांची विशेषतः महिला व लहान मुलांमध्ये भीती पसरून त्यांची तारांबळ उडाली होती. काही तरुण सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य राबवत घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना सुरक्षितस्थळी नेलं.
घरात 3 फुटापर्यंत शिरल्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालंय.
मात्र वेळीच मदत केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 20 महापौर रशीद शेख यांचा आहे.
या भागातून वाहणाऱ्या नाल्याची नीट सफाई करण्यात आली नसल्याने पुराचे पाणी घरात शिरून आमचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप नागरिकांनी करून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शहरातील योगायोग मंगल कार्यालय परिसर, 60 फुटीरोड, सोयगाव, आझाद नगर, पोलीस कवायत मैदान, हजार खोली, देवीचा मळा कॅम्प, सोमवार बाजार, अयोध्या नगर आदी परिसरात दोन ते तीन फुटापर्यंत पावसाचं पाणी साचलं. तर गटारं स्वच्छ केली नसल्याने पाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण झाला. पावसाबरोबरच गटारांतील पाणी रस्त्यावर आलं होतं.