Wed. Aug 10th, 2022

बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करणार – मुख्यमंत्री

राज्यात अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल-दुरुस्ती अभावी बंद पडलेल्या आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम टप्पा-2 राबविण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या कामात सुधारणा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घेण्या संदर्भातील आदेश मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कामाची आढावा बैठक झाली.

मराठवाडा वॉटर ग्रीड

मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी मराठवाडा वॉडर ग्रीड हा अत्यंत उपयुक्त प्रकल्प आहे. परंतु हे करत असताना कृषी व्यवसाय आणि पिण्याचे पाणी यांचा समतोल राखला जावा.

मराठवाड्यातील 8 जिल्हे आणि 11 धरणांना जोडणाऱ्या प्रकल्पामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

जल जीवन मिशन राबविणार

प्रत्येक घरात घरगुती नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे. यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या जल जीवन मिशन कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

पाणी पुरवठा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी ठोक पाणीपुरवठ्याचे राज्यात एकसारखे दर निश्चित करण्याचे धोरण ठरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले.

जल पुनर्भरण योजना राबवावी

भूगर्भातील पाणी साठवण ठेवणाऱ्या जलधरांची निश्चिती करावी.

तसेच विविध जल पुनर्भरण योजना राबविण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचे उद्‌भव पुनरुज्जीवित करण्यासाठी नवीन योजनांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदांकडे पुरेसा निधी नसतो. तो उपलब्ध करुन द्यावा.

त्यासाठी मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम टप्पा-2 मध्ये 50 कोटी रुपयांची तरतूद करावी.

केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमातील योजनेच्या 10 टक्के लोकवर्गणी घेण्याचे प्रस्तावित असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

नागरी व ग्रामीण भागातील योजनांना ठोक स्वरुपात पाणीपुरवठा करण्यासाठीच्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार कराव्यात, असे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

यावेळी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे, उपसचिव अभय महाजन, उपसचिव श्रीमती निधी चौधरी व पाणीपुरवठा विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.